मंचर: शेतातील ऊस पिकाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरेश पांडुरंग थोरात (वय 44) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ही घटना चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे सकाळी साडेसात वाजता घडली.
चांडोली गावातील सुरेश पांडुरंग थोरात यांची घराच्या बाजूला शेती असून तिच्यामध्ये उसाचे पीक घेतले आहे. थोरात सकाळी सात वाजता विज आल्यानंतर ऊसालापाणी भरण्यासाठी शेतात गेले होते. वीज पंप सुरू करून पाणी शेतात आल्यानंतर ते उसाला पाणी देऊ लागले. या शेतात एक वीज वाहक लोखंडी खांब आहे. काही दिवसांपूर्वी या खांबाला वाहन धडकल्याने तो आडवा झाला होता. मागणी करूनही वीज मंडळाने या खांबाची दुरुस्ती केली नव्हती. सदर खांबावरील केबल कट होऊन त्यातून वीज प्रवाह लोखंडी खांबाच्या अर्थिंग वायरमधून आला होता. सदरच्या खांबाजवळ पाणी भरत असताना थोरात यांचा स्पर्श खांबाला झाला आणि त्यांना विजेचा जबर धक्का बसून ते जागेवर कोसळले. बराच वेळ ते खांबाला चिकटलेल्या अवस्थेत होते. सकाळच्या वेळी गावातील ज्येष्ठ नागरिक वामन तुळशीराम थोरात हे मॉर्निंग वॉकसाठी तेथे आले असता त्यांना सदरचा प्रकार दिसला. वामन थोरात यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी सुरेश थोरात यांना उपचारासाठी तातडीने मंचर येथील एका खासगी दवाखान्यात आणले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सुरेश पांडुरंग थोरात हे उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. चांडोली परिसरात ही घटना समजताच ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतात येऊन पाहणी केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच वीज वितरण कंपनीच्या कामकाजावर ग्रामस्थांनी टीका केली आहे. संतप्त ग्रामस्थांनी जोपर्यंत कुटुंबीयांना भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. या घटनेने ग्रामस्थ संताप व्यक्त करत होते. मंचर पोलीस ठाण्यात तरुण जमा झाले होते. थोरात यांच्या पाठीमागे आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. वीज वितरण कंपनीने थोरात कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Web Summary : A farmer in Chandoli Budruk, Ambegaon, died after being electrocuted while watering his sugarcane field. He touched a faulty electric pole, resulting in his death. Locals are demanding compensation from the electricity company.
Web Summary : अंबेगांव के चांडोली बुद्रुक में गन्ना खेत में पानी देते समय करंट लगने से एक किसान की मौत हो गई। एक दोषपूर्ण बिजली के खंभे को छूने से यह घटना हुई। स्थानीय लोग बिजली कंपनी से मुआवजे की मांग कर रहे हैं।