कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून ५ ते ६ जणांकडून दरोडा; पती-पत्नी जखमी, खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:12 IST2025-02-24T15:11:34+5:302025-02-24T15:12:10+5:30

दरोडेखोरांच्या हल्ल्यात सासू व पती - पत्नी गंभीर जखमी झाले असून या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले

Family robbed by 5 to 6 people at knifepoint Husband and wife injured incident in Khed taluka | कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून ५ ते ६ जणांकडून दरोडा; पती-पत्नी जखमी, खेड तालुक्यातील घटना

कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून ५ ते ६ जणांकडून दरोडा; पती-पत्नी जखमी, खेड तालुक्यातील घटना

शेलपिंपळगाव : बहुळ (ता. खेड) येथे अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी एका कुटुंबाला चाकू व सुरीचा धाक दाखवून सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली. मात्र घरातील संबंधितांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दरोडेखोरांच्या हल्ल्यात सासू व पती - पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले असून चाकण पोलिसांकडून युद्ध पातळीवर तपास सुरू आहे.
        
दरोडेखोरांच्या हल्ल्यात शालन जयराम वाडेकर (वय ६५), अशोक जयराम वाडेकर (वय ३५) व उज्वला अशोक वाडेकर (वय ३२, सर्व रा. बहुळ) जखमी झाले आहेत. सोमवारी (दि. २४) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बहुळ गावच्या हद्दीतील फुल सुंदरवस्ती परिसरात घडली. याप्रकरणी जयराम लक्ष्मण वाडेकर (वय ६७) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

 चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या घरात मध्यरात्री पाच - सहा चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला. मात्र झोपेत असलेले फिर्यादी जयराम वाडेकर यांना अचानक पत्र्याच्या पेटीचा आवाज आल्याने जाग आली असता, २० ते २५ वयोगटातील जाडसर, सावळ्या वर्णाचा एक चोरटा हातात धारदार चाकू घेऊन त्यांच्याजवळ बसला होता. "गप्प राहा, नाहीतर चाकू भोसकतो!" अशी धमकी देत त्याने त्यांना जागेवरून हलण्यास मज्जाव केला. दरम्यान, इतर दोन चोरटे खोलीतील कपाटे आणि पेट्या फोडत होते. हॉलमध्ये झोपलेल्या शालन वाडेकर यांनी आवाज ऐकून घाबरत चोरट्यांना "काय घ्यायचे ते घ्या, पण आम्हाला मारू नका!" अशी विनवणी केली. मात्र, तरीही चोरट्यांनी हात उचलत त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावले.

दरम्यान जयराम आणि शालन यांचा ऐवज काढून घेतल्यानंतर चोरटे शांत बसले नाहीत. त्यांनी अशोक आणि उज्वला यांच्या बेडरूमचा दरवाजा कटावणीच्या साहाय्याने तोडला. अचानक दरवाजा उघडल्याने अशोक आणि उज्वला जागे झाले. प्रतिकार करताच, चोरट्यांनी दोघांच्या पोटात थेट चाकू भोसकला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दाम्पत्याने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी शालन वाडेकर यांनी मुलाला व सूनेला वाचवण्यासाठी धाव घेतली, मात्र, चोरट्यांपैकी एकाने त्यांना काठीने मारहाण केली. चोरट्यांनी सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १२ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. हल्ल्यानंतर चोरट्यांनी घराची बाहेरून कडी लावून पळ काढला. घटनास्थळी आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चाकण पोलीसांनी भेट घेऊन पाहणी केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निरीक्षक नाथा घार्गे करत आहेत.

Web Title: Family robbed by 5 to 6 people at knifepoint Husband and wife injured incident in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.