जुन्नरमध्ये उत्पन्नाचा बनावट दाखला देणारे रॅकेट उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 14:19 IST2025-01-12T14:19:54+5:302025-01-12T14:19:54+5:30
जुन्नर पोलिसांनी या संदर्भात विनोद चंद्रकांत बिडवई याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

जुन्नरमध्ये उत्पन्नाचा बनावट दाखला देणारे रॅकेट उघडकीस
जुन्नर : ५०० रुपयात अवघ्या पंधरा मिनिटात तहसीलदारांच्या डिजिटल सहीचा बनावट उत्पन्नाचा दाखला देणारे रॅकेट जुन्नर तालुका पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आहे. जुन्नर पोलिसांनी या संदर्भात विनोद चंद्रकांत बिडवई याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तालुका पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी या संदर्भात जुन्नर पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
पुरवठा विभागाच्या कार्यालयामधील कर्मचारी दीपाली कोकणे यांच्याकडे ताराबाई शिंदे या शिधापत्रिका काढण्यासाठी आल्या होत्या. कोकणे यांनी शिंदे यांच्याकडील कागदपत्राची छाननी केली असता त्यामध्ये त्यांचे उत्पन्न अक्षरी ४५००० नमूद केले होते. त्यामुळे कोकणे यांनी सदर महिलेला कमी उत्पन्नाचा दाखला घेऊन या असे सांगितले. त्यानंतर शिंदे या ४२००० रुपये उत्पन्न असल्याचा दाखला घेऊन आल्या. परंतु सदर उत्पन्नाच्या दाखल्यावर मागील तहसीलदार रवींद्र सबनीस यांची डिजिटल सही दिसल्याने कोकणे यांनी उत्पन्नाचा दाखला महसूल विभागाच्या ऑनलाइन वेबसाईटवर तपासला. त्यावेळी सदर उत्पन्न दाखल्याची कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती. म्हणून कोकणे यांनी पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांना सदरची माहिती दिल्याने त्यांनी उत्पन्न धारकाचा मुलगा दत्तात्रय शिंदे यास दाखला कोठे बनवला आहे. याची विचारणा केली.
त्यावर दत्तात्रय याने सदरचा दाखला जुन्नरमधील शंकरपुरा पेठ चौकातील रामकृष्ण हरी लॉटरी सेंटरमध्ये दाखला बनवला असल्याचे सांगितले. या संदर्भात पुरवठा निरीक्षक कुलकर्णी यांनी शिंदे यांचा लेखी जबाब घेतला. तसेच कार्यालयीन कर्मचारी अभिजित पिंगळे यास तुझ्या नावाचा उत्पन्नाचा दाखला घेऊन ये असे सांगितले. त्यानंतर पिंगळे यांनी पंधरा मिनिटातच त्याच्या नावाचा ४३ हजार रुपयांचा उत्पन्नाचा दाखला घेऊन आला. त्यावरून सदर दाखले हे बनावट असल्याची फिर्याद कुलकर्णी यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात दिली. तेथील सहायक पोलिस निरीक्षक एस. के. मोरे यांनी पुन्हा एक बोगस ग्राहक पाठवून त्यांच्याकडे पाचशे रुपये देऊन सदर ठिकाणी जाऊन उत्पन्नाचा दाखला आणण्यासाठी पाठविले.
त्याला देखील २० मिनिटात उत्पन्नाचा दाखला मिळाला. पोलिस पथकाने राम कृष्ण हरी लॉटरी सेंटरमध्ये जाऊन तेथे असलेल्या विनोद बिडवई याला उत्पन्नाचे दाखले तयार करण्याचा परवाना असल्याची विचारणा केली. तसेच पंचासमक्ष दुकानाची झडती घेतली असता त्याच्या दुकानातील ड्रॉवरमध्ये पोलिसांनी दिलेली पाचशे रुपयांची नोट तसेच इतरांचे उत्पन्नाचे दाखले आढळले. पोलिसांनी उत्पन्नाचे बनावट दाखले तयार करण्यासाठी लागणारे सीपीयू, मॉनिटर, कलर प्रिंटर आदी साहित्य जप्त केले. पोलिस निरीक्षक किरण अवचर, सहायक पोलिस निरीक्षक एस. के. मोरे पुढील तपास करत आहेत.