Pune News: बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; पुणे व्हाया मुंबई, दिल्ली गाझियाबाद कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 16:17 IST2025-01-17T16:16:24+5:302025-01-17T16:17:06+5:30

आत्तापर्यंत पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून १० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत

Fake currency racket busted Pune via Mumbai Delhi Ghaziabad connection | Pune News: बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; पुणे व्हाया मुंबई, दिल्ली गाझियाबाद कनेक्शन

Pune News: बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; पुणे व्हाया मुंबई, दिल्ली गाझियाबाद कनेक्शन

पुणे: गस्तीवर असलेल्या पोलिसांनापुणे-सातारा रोडवरील पद्मावती बस थांब्यासमोर एक व्यक्ती अत्यंत गडबडीने स्वारगेटच्या दिशेने जाताना दिसला. त्याची देहबोली पाहून पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिस कर्मचारी अमोल पवार आणि महेश मंडलिक या दोघांनी पाठलाग करून त्याला थांबवले. त्याच्याकडे विचारणा केली असता तो आणखीनच गडबडला अन् पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला.

नीलेश हिरानंद विरकर (३३, रा. चिंचवड स्टेशन समोर, चिंचवड) असे त्याचे नाव. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या २५० बनावट नोटा मिळून आल्या. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा सहकारनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. नीलेश याच्यासह सैफान कैय्युम पटेल (२६), अफजल समसुद्दीन शहा (१९), शाहीद जक्की कुरेशी (२५, रा. कोपर खैरणे, नवी मुंबई), शाहफहड उर्फ सोनू फिरोज अंसारी (२२, रा. नालासोपारा पूर्व, पालघर, ठाणे) यांना पाेलिसांनी अटक केली आहे. या टोळीचे दिल्ली, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद असे कनेक्शन समोर आले. याप्रकरणी, आत्तापर्यंत पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून १० लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या २ हजार ०७० बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

असा झाला रॅकेटचा पर्दाफाश..

सहकारनगर ठाण्याचे पोलिस कर्मचारी अमोल पवार आणि महेश मंडलिक हद्दीत गस्तीवर असताना, त्यांना विरकर गडबडीने स्वारगेटच्या दिशेने जाताना दिसला. त्याला थांबवून चौकशी केली असता, त्याच्याकडे ५०० रुपयांच्या २५० बनावट नोटा मिळून आल्या. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने या नोटा मुंबई येथील आरोपी शाहीद, सैफान आणि अफजल याने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांना शाहफहड अंसारी याने नोटा दिल्याचे पुढे आले. यानंतर पोलिसांनी अंसारीला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने या नोटा दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून आणल्याचे सांगितले. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक छगन कापसे, सहायक निरीक्षक सागर पाटील, सहायक उपनिरीक्षक बापू खुटवड, कर्मचारी किरण कांबळे, चंद्रकांत जाधव, बजरंग पवार, अमित पदमाळे, सागर सुतकर, अभिजित वालगुडे, योगेश ढोले आणि महेश भगत यांच्या पथकाने केली.

१ लाख २० हजार रुपयांच्या बदल्यात ३ लाखांच्या बनावट नोटा 

बनावट नोटा चलनात फिरवण्याचा या टोळीचा एक फॉर्म्युला ठरला होता. शाहफहड हा दिल्ली, गाझियाबाद येथून आणलेल्या नोटा पुणे आणि मुंबई येथील आरोपींना १ लाख २० हजार रुपयांच्या खऱ्या चलनी नोटांच्या बदल्यात बनावट ३ लाख रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल देत असे. आत्तापर्यंतच्या तपासात शाहफहड हा या प्रकरणी मुख्यसूत्रधार असून, त्यानेच दिल्ली, गाझियाबाद येथून बनावट नोटा मुंबई येथील सैफान, अफजल आणि शाहीद यांना दिल्या होत्या. तर त्या तिघांनी पुण्यात नीलेश विरकरला त्या दिल्या असल्याचे पोलिस सांगतात.

नीलेश विरकर हा संशयास्पद फिरत असताना सहकारनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. सुरुवातीला त्याच्याकडे बनावट नोटा मिळून आल्या. चौकशीत त्याने त्या नोटा मुंबई येथून आणल्या होत्या. तर मुंबई येथील आरोपींनी दिल्ली येथून आणल्याचे पुढे आले. दिल्ली, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे देखील या दृष्टिकोनातून पोलिस तपास करत आहेत. - स्मार्तना पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ २

Web Title: Fake currency racket busted Pune via Mumbai Delhi Ghaziabad connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.