पवार साहेबांवर टीका करण्याचा धंदा सगळ्यांनी बंद करावा; राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्षांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 10:58 IST2025-10-07T10:57:18+5:302025-10-07T10:58:32+5:30
पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय राज्यांच्या मुख्यमंत्र्यालाही याठिकाणी झोप येत नाही, सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांना, आमदार, खासदारांनाही झोप येत नाही.

पवार साहेबांवर टीका करण्याचा धंदा सगळ्यांनी बंद करावा; राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्षांचे आवाहन
पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आवाज उठवताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने सरकारवर सडकून टीका केली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जरांगे पाटील क्वचितच टीका करताना दिसले. काल जरांगे पाटील यांनी शरद पवार यांनी आमचं वाटोळच केला असल्याची टीका केली. ही टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाच्या चांगली जिव्हारी लागली असून पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
जगताप म्हणाले, सध्या महाराष्ट्रामध्ये जातीचं, धर्माचं राजकारण एकूण खूपच मोठ्या प्रमाणात याठिकाणी चाललेलं आहे. मी समजू शकतो लोकसभा असेल, लोकसभेनंतर विधानसभा असेल, आता स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी महायुती सरकार असेल किंवा महायुती सरकारला काल मदत करणारे छुपे घटक असतील. हे सातत्याने याठिकाणी महाराष्ट्रातनं जातीधर्माचं राजकारण किंवा आरक्षणाची लढाई ही कशी चिघळेल? यासाठीचा प्रयत्न करतायेत आणि मग मला याठिकाणी एका गोष्टीची निश्चित गंमत गंमत वाटते. तर जे शरदचंद्रजी पवार साहेब या राज्यामध्ये १९९५ सालापासून कुठल्याही घटनात्मक पदावर नाही.
ज्या पवार साहेबांचा पक्ष राज्यातल्या मुख्यमंत्री अर्थात घटनात्मक पद हे मुख्यमंत्री पदाचं उपमुख्यमंत्री पद हे तात्पुरतं किंवा दिखाव्याचं पद आहे असं माझं थेट मत आहे. त्याच्यामुळं ज्या पवार साहेबांकडे १९९९ सालापासून याठिकाणी कुठल्याही प्रकारचं घटनात्मक पद ज्यांच्या पक्षाकडं नाही. त्या पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय राज्यांच्या मुख्यमंत्र्यालाही याठिकाणी झोप येत नाही. राज्यातल्या एकूणच सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांना, आमदार, खासदारांनाही झोप येत नाही. आणि अलीकडच्या काळातील तर सामाजिक कार्यकर्त्यांची चढाओढ लागलेली आहे.
कधी लक्ष्मणराव हाके हे पवार साहेबांवर टीका करतात, तर कधी श्री मनोज पाटलांनी टीका केलेली आहे. मुळातच याठिकाणी कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यांच्या सर्टिफिकेटची गरज आदरणीय पवार साहेबांना नाही. पवार साहेबांनी मागचे ६८ वर्ष या महाराष्ट्रात या देशामध्ये जे सामाजिक राजकीय कार्य उभं केलेलं आहे. त्यासाठी याठिकाणी अशा प्रकारच्या टीकांना आम्ही फार काही महत्व देत नाही. होय पवार साहेबांनी मंडल आयोग लागू करून या राज्यातल्या महिलांना त्याचबरोबर सर्व जातीघटकांना याठिकाणी नोकरी, व्यवसाय शिक्षण आणि राजकीय जीवनामध्येच चांगल्या संधी उपलब्ध करून द्या.
याच पवार साहेब डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे मराठवाडा विद्यापीठाला देऊन त्याचं नाव विस्तार केला. महिलांना संरक्षण, पोलीस दलामध्ये पहिल्यांदा नोकरी करण्याचा सन्मान दिला. मराठ्यांसाठी आर्थिक विकास महामंडळं असेल, मातंग, बौद्ध, मुस्लिम समाजासाठी असेल. याच्यासाठी भरीव योगदान दिल. यामुळे कधी कधी अशी शंका येते की, महायुती सरकार प्रत्येकांनाच काहीतरी पाठवतं का काय? पवार साहेब मागच्या ३० वर्ष या देशातल्या या राज्यातल्या कुठल्याही घटनात्मक पदावर नाही. त्यांच्यावर टीका करणं हे एकूणच महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडे गमतीने पाहिल का नाही? याचं आत्मचिंतन सगळ्यांनी करावं. जे आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जे आज देशाचे पंतप्रधान आहेत. ज्यांच्याकडं अकरा वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्यांना जाब विचारण्याच्या ऐवजी पवार साहेबांवर टीका करण्याचा हा धंदा सगळ्यांनी बंद करावा. एवढीच माझी निमित्ताने विनंती राहील.