अगदी छाेटे संकट ओढवले तरी काेलमडून पडतात; विद्यार्थ्यांकडून उचलले जाते टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:33 IST2025-08-07T13:31:11+5:302025-08-07T13:33:19+5:30
अभ्यासात अतिशय हुशार असलेली, द्वितीय वर्षातील २३ वर्षीय ज्याेती मीना हिने टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला

अगदी छाेटे संकट ओढवले तरी काेलमडून पडतात; विद्यार्थ्यांकडून उचलले जाते टोकाचे पाऊल
पुणे: भरपूर पैसा मिळवायचाय, समाजात प्रतिष्ठा हवीय, तर माेठी नाेकरी मिळायलाच हवी... आवड असाे अथवा नसाे, समाजात ज्याला प्रतिष्ठा आहे, असा अभ्यासक्रम निवडायचा... हाच पालक आणि विद्यार्थ्यांचा एककलमी अजेंडा. त्यातून बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणाला प्राधान्य देतात. अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास... यात स्वत:ला गुंतवून घेतात आणि अगदी छाेटे संकट ओढवले तरी काेलमडून पडतात. अशा घटना वारंवार घडत असून, त्याचाच प्रत्यय मंगळवारी (दि. ५) बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आला. अभ्यासात अतिशय हुशार असलेली, द्वितीय वर्षातील २३ वर्षीय ज्याेती मीना हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि सर्वांनाच धक्का बसला. छात्र मानस कक्षात समुपदेशन घेऊनही या मुलीने इतके टाेकाचे पाऊल का उचलले, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
याबाबत ससून रुग्णालयातील छात्र मानस कक्षाचे प्रमुख, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निशिकांत थोरात म्हणाले, ‘अनेक विद्यार्थी मानसिक ताणतणावात दिसतात. याेग्य वेळी त्यांचे समुपदेशन झाले नाही तर टाेकाचे पाऊल उचलण्याचा धाेका असताे. स्पर्धेच्या युगातही यशस्वी झेप घ्यायची झाल्यास विद्यार्थ्यांना मानसिक ताणतणावाचे याेग्य व्यवस्थापन करता आले पाहिजे; जेणेकरून ते टाेकाचे पाऊल उचलणार नाहीत. याच दृष्टिकाेनातून ससून रुग्णालयात फेब्रुवारी महिन्यापासून छात्र मानस कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे; तसेच त्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वीपणे पाेहाेचविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी या केंद्राची मदत घेत ताण हलका करत आहेत. दरराेज किमान तीन-चार विद्यार्थी समुपदेशनासाठी येथे येतात. आतापर्यंत किमान ५० विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात करण्यात आले असून, आमच्या कामाचा विद्यार्थ्यांना फायदा हाेत आहे; तरीही ज्याेती हिने टाेकाचे पाऊल उचलले, हे धक्कादायक आहे.
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील वाढती निराशा विचारात घेऊन संभाव्य अनुचित प्रकार टाळण्याच्या दृष्टीने छात्र मानस कक्ष काम करत आहे. तसेच सर्वांगीण विकासावर आम्ही भर दिला आहे. यासाठी माझ्यासह दाेन सहायक समुपदेशक कार्यरत आहेत. आम्ही टीम म्हणून विद्यार्थ्यांनी वाढत्या ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करावं. चिंता, नैराश्य आणि इतर मानसिक आरोग्यविषयक समस्यांवर मात कशी करावी, याबाबत समुपदेशन आणि उपचार करत आहाेत. शिवाय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण तयार करणे, त्यांच्यात आत्मविश्वास वाढवणे आणि सामाजिक-शैक्षणिक प्रगती साधण्यास मदत करणे, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करणे यांवर आम्ही काम करत आहाेत, असेही डाॅ. थाेरात म्हणाले.
ससून रुग्णालयातील छात्र मानस कक्षात ज्याेती मीना ही विद्यार्थिनी समुपदेशन आणि उपचार घेत हाेती. त्यातून उभारी घेत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत हाेती. ती अभ्यासात हुशार हाेती; पण काही व्यक्तिगत समस्यांमुळे त्रस्त हाेती. त्यामुळे मार्च महिन्यापासून समुपदेशन, उपचार सुरू हाेते. रविवारीच काहीसे अस्वस्थ वाटत असल्याचे सांगून तिने फाेनवरून समुपदेशन घेतले हाेते आणि डाॅक्टरांनी सुचविलेले औषध घेऊन आता बरं वाटतंय असेही कळविले हाेते; पण अचानक मंगळवारी तिने टाेकाचे पाऊल उचलले आणि सर्वांनाच एकप्रकारे मानसिक धक्का दिला. - डॉ. निशिकांत थोरात, प्रमुख, छात्र मानस कक्ष