शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी पुण्यात शिक्षण उपनिरीक्षक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 09:33 IST2025-11-26T09:32:20+5:302025-11-26T09:33:40+5:30
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात आरोपीच्या केबिनमध्ये मंगळवारी (दि. २५) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी पुण्यात शिक्षण उपनिरीक्षक ताब्यात
पुणे : ‘शालार्थ आयडी’साठी एक लाख रुपयांची लाच घेताना शिक्षण उपनिरीक्षकाला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून, आरोपीविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावसाहेब मिरगणे (वय ५६) असे आरोपीचे नाव आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात आरोपीच्या केबिनमध्ये मंगळवारी (दि. २५) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केलेली असतानाच हा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अधिक माहितीनुसार, तक्रारदार यांची पत्नी सोलापूर जिल्ह्यात एका माध्यमिक शाळेत सहशिक्षिका आहे. त्यांना शालार्थ आयडी नसल्याने त्या २०१६ पासून विनावेतन काम करत होत्या. त्यांचा शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन चालू होणार होते. यासाठी तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचा शालार्थ आयडीचा प्रस्ताव दि. १६ जून २०२५ रोजी सोलापूर विभाग शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथे दाखल केला होता. हा प्रस्ताव ‘ई-ऑफिस’मार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांना सादर करण्यासाठी व तो प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी आरोपीने एक लाख रुपयांची लाच मागितली होती. तशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली होती.
या अनुषंगाने दि. १७ ते २१ नोव्हेंबरदरम्यान लाच मागणी पडताळणी करण्यात आली. यात आरोपी रावसाहेब मिरगणे यांनी एक लाच रुपये रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शिक्षण उप निरीक्षक रावसाहेब मिरगणे यांनी दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये रंगेहाथ पकडण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती. ही कारवाई पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, अपर अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.