Video: टायर निघाले असतानाही गाडी वेगात चालवली; पुण्यात मद्यधुंद कारचालकाचा संतापजनक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:06 IST2025-12-03T13:05:33+5:302025-12-03T13:06:29+5:30
चालक पार्टी करून आला होता, आणि मद्यधुंद अवस्थेत स्वतःबरोबरच इतरांचा जीव धोक्यात घालून कार चालवत होता

Video: टायर निघाले असतानाही गाडी वेगात चालवली; पुण्यात मद्यधुंद कारचालकाचा संतापजनक प्रकार
पुणे: पुणे शहरातील कॅम्प परिसरातून एक मद्यधुंद कारचालकाचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. गाडीचे टायर निघाले असतानाही जीवाशी खेळ करत भरधाव वेगात गाडी चालवल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. स्वतःबरोबर इतरांचा जीव धोक्यात घालण्याचे कृत्य या चालकाने केले आहे. या व्यक्तीवर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टायर निघाले असतानाही गाडी वेगात चालवली; पुण्यात मद्यधुंद कारचालकाचा संतापजनक प्रकार#Pune#bandgardenpolice#car#socialviralpic.twitter.com/52GIg6S65z
— Lokmat (@lokmat) December 3, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चालक कल्याणी नगरपासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत हा मद्यधुंद अवस्थेत आपली कार चालवत होता. हातावर पार्टीचा बँड देखील दिसत असल्याने तो पार्टी करून आला होता. स्वतःच्या जीवाची परवा न करता आणि इतरांचा जीव धोक्यात घालून हा मद्यधुंद चालक कार चालवत होता. त्यावेळी एका युवकाने गाडीचा पाठलाग करत धाडस दाखवून त्याची कार थांबवली. बंडगार्डन पोलिसांची नाकेबंदी सुरू असताना हा सर्व प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. गाडीचा टायर निघालेला असताना देखील चालक कार पळवत होता, याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
पुण्यात मद्यधुंद चालकांचे प्रमाण वाढत चालले आहे. हिंजवडीतही एका आयटी कंपनीच्या बसचालकाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून ३ मुलांचा बळी घेतला. पोलिसांकडून कडक नियमावली देऊनही चालक न घाबरता मद्यप्राशन करून गाडी चालवत आहेत. रात्रीच्या वेळी हे प्रमाण जास्त असल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे स्वतः सोबतच इतरांचा जीवही हे चालक धोक्यात घालत आहेत. या पार्श्वभूमीवर आता मद्यधुंद चालकांना कडक शिक्षेची मागणी नागरिक करू लागले आहेत.