शिरूरमध्ये २० कोटींचे ड्रग्स जप्त; धक्कादायक बाब म्हणजे अहिल्यानगरचा पोलीसच निघाला तस्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:08 IST2026-01-21T15:08:11+5:302026-01-21T15:08:24+5:30
विशेष म्हणजे, गुन्हेगारांवर छापे टाकणाऱ्या यंत्रणेत बसूनच या हवालदाराने ड्रग्स तस्करीला संरक्षण, माहिती व सोयी पुरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

शिरूरमध्ये २० कोटींचे ड्रग्स जप्त; धक्कादायक बाब म्हणजे अहिल्यानगरचा पोलीसच निघाला तस्कर
शिरूर : शिरूर पोलिस व पुणे स्थानिक गुन्हे शाखा यांनी अहिल्यानगर जिल्हातील सिमावर्ती भागात संयुक्त करवाई करत तब्बल 20 कोटी रुपये किमतीचे 10 किलो एमडी ड्रग्स जप्त केले आहे. विशेषतः या प्रकरणात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) पोलीस हवालदारच या ड्रग्स रॅकेटमधील तस्कर असल्याचे उघड झाले आहे. यामुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. शाम सुंदर गुजर (रा. नेप्ती, ता. नगर, जि. अहिल्यानगर) असे या ड्रग्स तस्करी प्रकरणातील मुख्य तस्कर असून तो अहिल्या नगर एलसीबीमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणात ड्रग्सचा माल पुरवणारा माऊली शिंदे (रा. कोहकडी, ता. पारनेर) यालाही पोलिसांनी अटक केली असून, आतापर्यंत आरोपींची संख्या तीन झाली आहे.
शिरूर पोलिसांनी शनिवारी (दि. 17) मध्यरात्री शिरूरच्या बाबुराव नगर येथे छापा टाकून एकाकडून 2 कोटी 10 लाख रुपयांचे मिफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणी शाबाद शेख (रा. शिरूर) यास अटक करण्यात आली होती. शेख याच्या कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांनी शिरूर जवळील पुणे, अहिल्यानगर सिमावर्ती भागातील कुरुंद या गावात छापे टाकून 10 किलो ड्रग्ज जप्त केले.
यंत्रणेत बसून तस्करी
पोलीस हवालदार गुजर या साखळीतील महत्त्वाचा वितरक असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे याच्या माध्यमातून ड्रग्स ग्रामीण भागात तसेच शाबाद शेख व इतरांकडून ते महाविद्यालयीन तरुणाईपर्यंत पोहोचवले जात होते. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, हे ड्रग्स केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित नसून आंतरजिल्हा व आंतरराज्य नेटवर्कशी जोडलेले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, गुन्हेगारांवर छापे टाकणाऱ्या यंत्रणेत बसूनच गुजर अमली पदार्थांच्या तस्करीला संरक्षण, माहिती व सोयी पुरवत होता, अखेर पुरावे ठोस झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आले आहे.