पुणे : पुण्यातील अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत एका निलंबित एमबीबीएस डॉक्टरसह तिघांना बेड्या ठोकल्या. बिबवेवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, तिघांकडून तब्बल ११ लाख ४३ हजार रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
अधिकच्या माहितीनुसार, मोहमद उर्फ आयान जारून शेख (२७, रा. उंड्री), सॅम्युअल बाळासाहेब प्रताप (२८, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) आणि अनिकेत विठ्ठल कुडले (२७, रा. नारायण पेठ) ड्रग्जप्रकरणात निलंबित एमबीबीएस डॉक्टरसह या तिघांना अटक केली आहे. तसेच ११ लाखांचा एमडी जप्त केले आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, उपनिरीक्षक दिंगबर कोकाटे, दयानंद तेलंगे आणि त्यांच्या पथकाने केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील निमंत्रण हॉटेलसमोर कारवाई करण्यात आली. संशयितांच्या झडतीत मोहमदकडे ५ लाख ५ हजार रुपयांचा २९ ग्रॅम एमडी, तर सॅम्युअलकडे ६ लाख ३८ हजार रुपयांचा एमडी मिळाला. एकूण १५ लाख ८४ हजार रुपयांचा अमली पदार्थ आणि इतर ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
डॉक्टर असूनही गुन्हेगारी कृत्य
मोहमद शेख हा मूळचा जम्मूचा असून, एमबीबीएस शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील नामांकित रुग्णालयात प्रॅक्टिस करत होता. यापूर्वीही तो ड्रग्जप्रकरणात अडकला होता आणि त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. तरीदेखील त्याने पुन्हा ड्रग्ज तस्करीचा मार्ग अवलंबल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक चौकशीत तिघेही वेगवेगळ्या भागात राहणारे असून, त्यांनी हे अमली पदार्थ कोठून आणले याचा तपास सुरू आहे. मोहमद शेख काही ओळखीतील व्यक्तींना ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे.