Jayant Narlikar: डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल; पुण्यातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:23 IST2025-05-20T14:21:51+5:302025-05-20T14:23:54+5:30

Jayant Narlikar Death: आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानात डॉ. नारळीकर यांचे नाव आदराने घेतले जाणार

Dr. Jayant Narlikar's work will always be an inspiration for generations to come; Pune leaders pay tribute | Jayant Narlikar: डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल; पुण्यातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Jayant Narlikar: डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल; पुण्यातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Jayant Narlikar Death: प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे वैज्ञानिक, साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा मावळला आहे. डॉ. नारळीकर हे महाराष्ट्राच्या ज्ञान-विज्ञान परंपरेचा एक महत्वाचा आदर्श होते. नारळीकर यांना पुण्यातील नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.  

शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्राचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानात डॉ. नारळीकर यांचे नाव नेहमीच आदराने व सन्मानाने घेतले जाते. प्रसिद्ध ब्रिटिश वैज्ञानिक सर फ्रेड हॉईल यांच्यासह त्यांनी मांडलेला हॉईल-नारळीकर सिद्धांत वैज्ञानिक जगतात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) आणि आयुका (IUCAA) या संस्थांच्या माध्यमातून देशातील वैज्ञानिक संशोधनाला महत्त्वपूर्ण दिशा दिली. खगोलशास्त्र जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेले लेखन आणि दिलेली व्याख्याने विज्ञान प्रसारासाठी अत्यंत मोलाची ठरली आहेत. डॉ. नारळीकर हे आजीवन विज्ञानवाद जोपासणारे आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कटिबद्ध राहिलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल. भारताच्या या महान वैज्ञानिकास भावपूर्ण श्रद्धांजली..!

मुरलीधर मोहोळ वाहिली श्रद्धांजली

डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानप्रसारक, लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !  डॉ. जयंत नारळीकर यांनी आपल्या संशोधन, लेखन आणि विज्ञानप्रसाराच्या कार्यातून विज्ञानाला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांनी स्थिर स्थिती विश्वसिद्धांतावर केलेले संशोधन आणि ‘हॉयल-नारळीकर सिद्धांत’ हे त्यांच्या वैज्ञानिक योगदानाचे महत्त्वपूर्ण भाग आहेत. महापौरपदावर असताना डॉ. नारळीकर यांची भेट घेतली होती. शरीर थकलेले असतानाही त्यांच्यातील उत्साह माझ्यासारख्यालाही लाजवणारा होता. संशोधक म्हणून असणारी त्यांची उंची उत्तुंग तर होतीच, पण त्यांच्यातील माणूसपणही भावणारे होते. सामान्यांमध्येही विज्ञानाची गोडी निर्माण करण्यात डॉ. नारळीकर यांच्या लेखणीचा मोठा वाटा होता. या लेखणीमुळे अनेकांना खगोल विश्वाकडे, विशेषतः संशोधनाकडे आकर्षित केलं. ‘आयुका’च्या स्थापनेद्वारे त्यांनी भारतातील खगोलशास्त्र संशोधनाला नवी दिशा दिली. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने विज्ञानजगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे !

मेधा कुलकर्णी यांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ, लेखक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांचे दुःखद निधन झाले आहे. खगोलभौतिकी, गणित, विज्ञान व लेखन क्षेत्रात त्यांचे कार्य अतुलनीय आहे. विद्यार्थ्यांची खगोलशास्त्रात आवड निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांना खगोल शास्त्रासंदर्भात सखोल संशोधन करता यावे म्हणून पुण्यात 'आयुका' या संस्थेची स्थापना डॉ. नारळीकरांनी केली होती. त्यांच्या जाण्याने भारतीय विज्ञान क्षेत्रातील एक कोहिनूर हिरा निखळला आहे. डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्य आणि विचार अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. ईश्वर त्यांच्या पावन आत्म्यास शांती व सद्गती प्रदान करो, हीच प्रार्थना.. ॐ शांति।

सुप्रिया सुळे यांनी वाहिली श्रद्धांजली

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ तथा गणितज्ज्ञ डॉ जयंत नारळीकर यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत हॉयल-नारळीकर सिद्धांत मांडला. विश्वातील गुरुत्वाकर्षण आणि कण वस्तुमान सिद्धांताशी हा सिद्धांत संबंधित आहे. यासोबतच त्यांचे साहित्याच्या क्षेत्रातही मोठे योगदान आहे. मराठी  भाषेत उत्कृष्ट विज्ञानकथा लिहून त्यांनी नव्या पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी मोलाचे कार्य केले. त्यांच्या साहित्यसेवेची दखल घेऊन त्यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांच्या निधनामुळे देश एका महान वैज्ञानिकास मुकला आहे. डॉ जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

माधुरी मिसाळ यांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. जयंत नारळीकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील विज्ञानविश्वाला मोठा धक्का बसला आहे. ज्ञान, प्रज्ञा, सुलभता आणि साधेपणा यांचा अभूतपूर्व संगम असलेले नारळीकर सर हे केवळ वैज्ञानिक नव्हते, ते विज्ञानाचे जनकवी होते. त्यांच्या लेखणीने विज्ञानाला लोकाभिमुख केलं, त्यांच्या अभ्यासाने भारताला खगोलशास्त्रात मानाचं स्थान मिळवून दिलं. केंब्रिज विद्यापीठातले शिक्षण, टाटा मूलभूत संस्थेतील संशोधन, आयुका संस्थेची स्थापना आणि मराठी भाषेतून विज्ञानाचा प्रसार ही त्यांची वैचारिक आणि बौद्धिक यात्रा प्रेरणादायी होती. आज आपण एका ‘ज्ञानवृक्षा’ला मुकलो आहोत. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणं अशक्य आहे. मी डॉ. जयंत नारळीकर यांना कृतज्ञता भावनेने व अंत:करणपूर्वक श्रद्धांजली अर्पण करते. त्यांची आठवण सदैव आपल्या विचारांत, विज्ञानप्रेमात व लेखनात जिवंत राहील. ॐ शांती!

Web Title: Dr. Jayant Narlikar's work will always be an inspiration for generations to come; Pune leaders pay tribute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.