रोड रोलरखाली येऊन ४ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; वडील म्हणाले,'सांगत होतो की, रोलर हळू चालव पण...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:27 IST2026-01-24T15:59:54+5:302026-01-24T16:27:29+5:30
- आर्यन जवळच खेळत असताना मागे येणाऱ्या रोड रोलरखाली सापडला.

रोड रोलरखाली येऊन ४ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; वडील म्हणाले,'सांगत होतो की, रोलर हळू चालव पण...'
दौंड : दौंड शहरातील जनता कॉलनी परिसरात रस्त्याच्या कामादरम्यान झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आई-वडिलांच्या डोळ्यादेखत ही घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
आर्यन संतोष जाधव (वय ४, रा. दौंड शुगर कारखाना परिसर, मूळ रा. अहिरीतांडा, ता. विजापूर, कर्नाटक) असे मृत बालकाचे नाव आहे. या प्रकरणी रोलर चालक परशुराम शंकर राठोड (रा. अंकलगा, ता. जेवर्गी, कर्नाटक) याला पोलिसांनी अटक केली आहे.
गुरुवारी (दि. २२) दुपारी साडेचारच्या सुमारास जनता कॉलनीत रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते. याच ठिकाणी आर्यनचे आई-वडील मजुरीचे काम करत होते. काम सुरू असताना आर्यन रस्त्याच्या कडेला खेळत होता. दरम्यान, रोलर चालकाने मागील बाजूची खात्री न करता आणि वेगावर नियंत्रण न ठेवता रोलर चालवला. अचानक झालेल्या धडकेत आर्यन गंभीर जखमी झाला व जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कामावरील निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले. मयत बालकाचे वडील संतोष जाधव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
आर्यनचे वडील संतोष जाधव यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून रोलर चालक बेदरकारपणे वाहन चालवत होता. त्याला वारंवार सावध केले होते. मात्र त्याने दुर्लक्ष केले आणि त्याची किंमत माझ्या चिमुकल्याला जीव देऊन चुकवावी लागली. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. कर्नाटकातून रोजगारासाठी दौंडमध्ये आलेल्या जाधव कुटुंबावर अचानक आलेल्या या दु:खद प्रसंगामुळे संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.