भावकी, गावकी, धर्म, जात, पंथ पाहू नका; शेतकरी हीच जात मानून मतदान करा; अजित पवारांची भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 12:37 IST2025-05-17T12:36:54+5:302025-05-17T12:37:44+5:30

कारखान्याला उद्या दिल्लीमधील मदत लागली तर मी पृथ्वीराज जाचक यांना सोबत घेऊन अमित शहांकडे जाईल आणि मदत आणेल

Don't look at Bhavki, Villageki, Religion, Caste, Sect; Vote considering farmers as your caste; Ajit Pawar's emotional appeal | भावकी, गावकी, धर्म, जात, पंथ पाहू नका; शेतकरी हीच जात मानून मतदान करा; अजित पवारांची भावनिक साद

भावकी, गावकी, धर्म, जात, पंथ पाहू नका; शेतकरी हीच जात मानून मतदान करा; अजित पवारांची भावनिक साद

लासुर्णे / कुरवली ( पुणे ): लोकसभा, विधानसभेला काय झालं याचा विचार करू नका. झालं-गेलं गंगेला मिळालं. भावकी, गावकी, धर्म, जात, पंथ पाहू नका, शेतकरी हीच जात मानून मतदान करा. तुमचा प्रपंच कोणाच्या हातात द्यायचा ते ठरवा, अशी भावनिक साद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातली.

कुरवली (ता. इंदापूर) येथे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रचारसभा गुरुवारी (ता. १५) पार पडली. यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मागे सोमेश्वर कारखानाही असाच अडचणीत आला होता. त्यामध्ये प्रयत्नपूर्वक नियोजन करून तो राज्यात पहिल्या पाचमध्ये आला. कारखाना पहिल्या पाचमध्ये आपल्याला आणायचा आहे. जाचक यांच्यासमवेतचे मागचे राजकीय संबंध सोडून दिले. ते माझ्या स्वार्थासाठी सोडले नाहीत, तर २२ हजार सभासदांसाठी ते सोडले. आपल्याला शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासह कामगारांना नियमित पगार देणे आवश्यक आहे. माझ्यासह दत्तात्रय भरणे यामध्ये मदत करू शकतात, केंद्राची मदत आपण मिळवू शकतो. कारखान्याचे गतवैभव आणायची धमक आमच्या तिघांमध्ये आहे. याच मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहोत. यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. यंदा भावी संचालकांना कारखान्याची गाडीदेखील मिळणार नाही. चहापाण्याशिवाय काहीच मिळणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. काही गावांना उमेदवारी देताना मर्यादा असल्याने प्रतिनिधित्व देणे शक्य झाले नाही. याबाबत योग्य तो मार्ग काढू. उर्वरित दिवसांत आपल्याला चांगले काम करायचे आहे. संबंधितांनी वेड्यावाकड्या प्रकाराला बळी पडू नये. पाच वर्षांत कारखाना जाचक यांच्या नेतृत्वाखाली वरच्या क्रमांकावर आणण्याचे काम करू, असे आवाहन पवार यांनी केले.

प्रत्येकाला अधिकार आहे; पण काहीजण विनाकारण टीकाटिपण्णी करतात. नेहमीच्या आणि आत्ताच्या निवडणुकीत फरक आहे. माझी सुरुवात या कारखान्यापासून झाली; त्यामुळे माझे कारखान्याचे वेगळे नाते आहे. अपेक्षित पद्धतीने कारखाना चालला नसल्याची माझ्यासह सभासदांची खंत आहे. मागील काळात आमच्या काही चुका झाल्या असतील तर त्या पदरात घ्या; पण पुढे अशा चुका करायच्या नसल्याचे पवार म्हणाले. उमेदवारी देताना कोण जवळचा, लांबचा हे पाहिले नाही. सुरुवातीच्या सर्वपक्षीय सभेत सर्वांनाच बोलावलं होत, कोणाच्या घरचे लग्न नव्हते, असा टोलादेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला.

मागचं सर्व सोडून आम्ही एकत्र आलो
कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे पाणी उजनी धरणात घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सीएसआरसाठी मोठ्या उद्योगपती यांच्याशी बोललेलो आहे. छत्रपती विद्यालयासाठी मला निधी द्यायचा आहे. देशातील मोठ्या उद्योगपती यांच्याशी माझी ओळख आहे. मी अगोदर यात पडणार नव्हतो; पण विचार केला माझी सुरुवात याच कारखान्यातून झाली. मग बँकेत पोहोचलो, राज्यात ओळख झाली. म्हणून वाटलं की, सभासदांना वाऱ्यावर सोडता येणार नाही; म्हणून मागंच सोडून आम्ही एकत्र आलो. येणाऱ्या दिवसांत अफवा उठतील, त्यावर विश्वास ठेवू नका. कारखान्याला उद्या दिल्लीमधील मदत लागली तर मी पृथ्वीराज जाचक यांना सोबत घेऊन अमित शहांकडे जाईल आणि मदत आणेल, असेही यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

Web Title: Don't look at Bhavki, Villageki, Religion, Caste, Sect; Vote considering farmers as your caste; Ajit Pawar's emotional appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.