Do not need one kilo of onion, give only 250 gram onion ! | कांदा एक किलो नको, पाव किलोच द्या ! 
कांदा एक किलो नको, पाव किलोच द्या ! 

ठळक मुद्देअवकाळी पावसाने गृहिणींचे बजेट कोलमडले : भाजीपाला, फळे महागली, आवक कमी अवकाळीचा आता शेतकऱ्यांबरोबरच शहरी भागातील नागरिकांनादेखील मोठा फटका

पुणे : जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका फळभाज्या, पालेभाज्यांना बसला आहे. बाजारामध्ये फळभाज्या, पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून, दैनंदिन जीवनातील भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे मात्र सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. जुडीवरून आता दहा रुपयांची कोथिंबीर आणि एक किलो कांद्यावरून पाव किलो घेण्यावर सामान्य नागरिक आले आहेत. 
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे हाताशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या अवकाळीचा आता शेतकऱ्यांबरोबरच शहरी भागातील नागरिकांनादेखील मोठा फटका बसला आहे. कोथिंबिरीचे दर गेल्या काही दिवसांत ८० रुपयांवरून ४० ते ५० रुपयांपर्यंत खाली आले आहे. पावसामुळे कोथिंबिरीचा दर्जादेखील घसरला आहे. यामुळे सध्या सर्वसामान्य कुटुंबांच्या किचनमधून कोथिंबीर गायब झाली आहे. दरम्यान, कांदा ८० रुपये किलो, शेवगा १०० ते १२० रुपये किलो, गाजर ५० ते ७० रुपये किलो, मटार १२० ते १५० रुपये किलो, आले ८० ते १०० रुपये 
किलोपर्यंत दर गेले आहेत. दरम्यान, पालेभाज्यांचा दर्जादेखील पावसामुळे प्रचंड घसरला असून, दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.  यामध्ये कोथिंबीर ४० ते ५० रुपये जुडी, मेथी - ३० ते ४० रुपये जुडी, कांदापात- २५ ते ३० रुपये जुडी, पालक २० ते २५ रुपये जुडीचे दर झाले आहेत. येते काही दिवस फळभाज्या, पालेभाज्यांमध्ये आलेली तेजी कायम राहील, असे विक्रेत्यांनी सांगितले. यामुळे मात्र सर्वच गृहिणींचे महिन्याचे बजेट मात्र कोलमडले आहे. 
......
स्वयंपाकातील कांद्याचे प्रमाण कमी केले
कांद्याशिवाय घरामध्ये एकही भाजी करणे शक्य होत नाही; परंतु गेल्या काही दिवसांत कांदा ७०-८० रुपये किलो दराने विकला जात आहे. यामध्ये आकाराने कमी असलेला कांदादेखील ५० रुपयांच्या खाली मिळेना. यामुळे मात्र रोजच्या स्वयंपाकातील कांद्याचे प्रमाण कमी केले आहे. इतर फळभाज्या, पालेभाज्यांचे दरदेखील परवडत नाहीत. कुटुंबातील लोकांची संख्या लक्षात घेता अर्धा किलो 
भाजीदेखील कमी पडते; परंतु दर वाढल्याने कडधान्यांवर भागविण्याची वेळ आली.- आरती बंडा, गंज पेठ (गृहिणी)
.........
पंधरा दिवसांपासून किचनमध्ये कोथिंबीरच वापरली नाही
दिवाळीपासून आमच्या भाजीवाल्याकडे कोथिंबीर ५० रुपयांच्या खाली आलीच नाही. यामुळे गरज असेल तशी दहा-पंधरा रुपयांची कोथिंबीर घेत होतो; परंतु आता पावसामुळे कोथिंबिरीचा दर्जा खूपच खराब असतो. यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून आम्ही कोथिंबीरच आणलेली नाही. अन्य फळभाज्यांचे दरदेखील खूप वाढले आहेत. यामुळे आठवड्याला २००-२५० रुपयांची भाजी लागत असताना, आता हे बजेट ४००-५०० रुपयांच्या घरामध्ये गेले आहे.- सुचिता ढोमसे, नांदेड सिटी (गृहिणी)
.........
वांगी, गवार, कोथिंबीर घेणे टाळतेच
गेल्या काही दिवसांत वांगी, गवार, कोथिंबीर, कांदा घेताना विचार करावा लागत आहे. कोथिंबीर, वांगी, गवार तर घेणेच टाळते. पावसामुळे पालेभाज्या तर घेऊच वाटत नाही.  फळभाज्या, पालेभाज्यांचे वाढते दर लक्षात घेता, घरामध्ये पौष्टिक व हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे. पाऊस थांबल्याने अपेक्षा आहे की, लवकरच दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील.-  सुवर्णा सूर्यवंशी, लोहगाव (गृहिणी) 
......
फळांचे दरदेखील वाढले
सध्या अवकाळी पावसामुळे  शहरामध्ये डेंग्यू, मलेरिया, हिवताप, सर्दी आदी साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 
.....
वाढत्या आजारपणा बरोबरच नागरिकांकडून फळांच्या मागणीमध्ये देखील वाढ झाली आहे; परंतु अवकाळी पावसाचा मोठा फटका फळ पिकांनादेखील बसला आहे. 
........
यामुळे सफरचंद, डाळिंब, मोसंबी, बोरे, चिक्कू, संत्रा आदी फळांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे देखील गृहिणींच्या बजेटवर परिणाम झाला आहे.

Web Title: Do not need one kilo of onion, give only 250 gram onion !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.