जीवनात चांगले काम करा; लोकांनी व्यसनापासून दूर रहा, इंदुरीकर महाराज यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:48 IST2026-01-24T16:46:58+5:302026-01-24T16:48:00+5:30
आचार-विचार शुद्ध असल्यास हातून चांगले काम घडेल, आई-वडिलांची तसेच देशाची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे

जीवनात चांगले काम करा; लोकांनी व्यसनापासून दूर रहा, इंदुरीकर महाराज यांचे आवाहन
मंचर : कर्म कुणाला चुकत नाही. त्यामुळे जीवन जगत असताना चांगले काम करा. आई-वडिलांची सेवा करत असताना देशसेवासुद्धा झाली पाहिजे. व्यसनापासून दूर राहा, असे आवाहन समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांनी केले.
श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थानात गणेश जयंती उत्सवानिमित्त देव जन्माच्या कीर्तनात देशमुख महाराज बोलत होते. देशमुख महाराज पुढे म्हणाले, पुणे जिल्हा ही पुण्यभूमी आहे. त्यातही श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग हे गाव अर्धपीठ गणपतीमुळे राज्यात प्रसिद्ध झाले आहे. या भूमीत आपला जन्म झाला ही भाग्याची गोष्ट आहे असे सांगून देशमुख महाराज म्हणाले, जीवन जगत असताना चांगले कर्म करा. आचार-विचार शुद्ध असल्यास हातून चांगले काम घडेल. आई-वडिलांची तसेच देशाची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे. जीवनात सकारात्मक राहा. व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन देशमुख महाराज यांनी केले. दरम्यान, अर्धपीठ गणपती देवस्थानात गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटे महापूजा त्यानंतर अभिषेक, आरती झाली. सकाळी हारतुरे, मांडव डहाळ्याची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
अग्रभागी असलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने सर्वांची मने जिंकून घेतली. वाद्यवृंद सहभागी झाला होता. देव जन्माचे कीर्तन झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. दुपारी भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी श्रींच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये बालवारकरी सहभागी झाले होते. अर्धपीठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार दर्शनासाठी आले होते. श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान ट्रस्टने व्यवस्था पाहिली.