चारित्र्याच्या संशयावरून घटस्फोट; पती मूकबधीर, मोठा भाऊ खंबीरपणे उभा राहिला अन् खटला चालवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:26 IST2025-11-24T17:26:04+5:302025-11-24T17:26:21+5:30
पत्नीने मागितलेल्या ५० लाखांच्या पोटगीवरून मध्यस्थीनंतर १२ लाख पोटगीवर घटफोट मंजूर झाला

चारित्र्याच्या संशयावरून घटस्फोट; पती मूकबधीर, मोठा भाऊ खंबीरपणे उभा राहिला अन् खटला चालवला
पुणे: पती मूकबधीर सरकारी नोकरदार. एका गरीब कुटुंबातील मुलीशी लग्न करून त्याने पत्नीला शिकविले आणि सरकारी नोकरी लावली. पुढे वीस वर्षांनी चारित्र्याच्या संशयाचे भूत दोघांच्या मानगुटीवर असे बसले की, दोघांमध्ये टोकाचा दुरावा निर्माण झाला. पतीला ‘तिला’ नांदवायचे होते. पण, ती वेगळे होण्यावर ठाम होती. पती - पत्नीच्या वादात मूकबधीर भावामागे मोठा भाऊ खंबीरपणे उभा राहिला. लहान भाऊ हातवारे करून मोठ्या भावाची व्यथा कौटुंबिक न्यायालयासमोर मांडत होता. दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचे स्वप्न धूसर झाल्यानंतर मध्यस्थीद्वारे अखेर या दाम्पत्याचा परस्पर संमतीने कोर्टाने घटस्फोट मंजूर केला.
राकेश आणि स्मिता (नावे बदललेली) दोघेही मूळ सोलापूरचे. कोंढवा येथे स्थायिक झाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मुलगा पदवीधर असून, मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. लग्नाच्या वीस वर्षांनंतर दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागले. हा वाद इतका विकोपाला गेला की. एकत्रित घेतलेल्या सदनिकेचे हप्तेही दोघांनी भरले नाहीत. परिणामी, सदनिका बँकेने जप्त केली. नंतर दोघांनीही एकमेकांविरोधात न्यायालयात खटले दाखल केले. स्मिताने घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार तसेच पोटगी मिळावी म्हणून अर्ज केला. राकेश याने पत्नी नांदायला येण्यासाठी अर्ज केला. तीन वर्षांपासून कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेला वाद पाहता न्यायाधीशांनी हे प्रकरण प्रशिक्षित मध्यस्थ ॲड. इब्राहिम अब्दुल शेख यांच्याकडे मध्यस्थीसाठी पाठविले. त्यांनी चार वेळा मध्यस्थी केली. पत्नी ५० लाख, तर पती २ लाख पोटगीवर ठाम होते. मध्यस्थीनंतर दोघेही १२ लाख रुपये पोटगी व मुलांचा ताबा पत्नीकडे राहील, यासह विविध अटी, शर्ती मंजूर करत एकमेकांवरील गुन्हे मागे घेण्यास तयार झाले. मुलांना पती भेटेल, त्यांना फिरण्यास घेऊन जाईल, फोन करेल, ही अट पत्नीने मान्य केली. शेवटी कोर्टानेही परस्पर संमतीने घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.