माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार; आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक, पुण्यात भोंदूकडून महिलेवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 13:21 IST2026-04-13T13:21:37+5:302026-04-13T13:21:49+5:30
महिलेची पाच वर्षांपूर्वी एका व्यक्ती मार्फत भोंदूशी ओळख झाली, तेव्हा त्याने देवऋषी असल्याची बतावणी महिलेकडे केली. माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार आहे, अशी बतावणी त्याने केली

माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार; आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक, पुण्यात भोंदूकडून महिलेवर अत्याचार
पुणे : नाशिकमधील भोंदू अशोक खरात तसेच पुण्यातील ऋषिकेश वैद्य प्रकरण ताजे असतानाच सोलापूर येथील एका भोंदूने स्वत:ला देवऋषी असून अडकलेली कामे करून देतो, असे सांगत एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तसेच महिलेची ५० लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एका भोंदूविरोधात स्वारगेटपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. औदुंबर मनोहर गडदे (वय ४३, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), असे भोंदू आरोपीचे नाव आहे. याबाबत एका ४२ वर्षीय महिलेने स्वारगेटपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे पतीशी पटत नव्हते. त्यांच्यात कौटुंबिक वाद झाल्याने ती वेगळी राहत होती. महिलेची पाच वर्षांपूर्वी एका व्यक्ती मार्फत गडदे याच्याशी ओळख झाली. तेव्हा गडदे याने देवऋषी असल्याची बतावणी महिलेकडे केली. माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार आहे, अशी बतावणी त्याने केली. कौटुंबिक समस्या दूर करतो, असे सांगून त्याने महिलेला जाळ्यात ओढले. त्याने महिलेला स्वारगेट परिसरातील एका लाॅजवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर त्याने महिलेला लोणेरे, उत्तेखोल आणि माणगाव येथे देखील महिलेवर बलात्कार केला. महिलेला नोकरी, तसेच बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून आरोपी गडदेने तिच्याकडून वेळोवेळी ५० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. काही रक्कम रोख स्वरूपात घेतली तसेच महिलेकडून दागिने घेतले. गेले पाच ते सहा वर्षे हा प्रकार सुरू होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत. दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करून पुण्यातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी यापूर्वी ऋषिकेश श्रीकांत वैद्य (३९, रा. वसई, जि. पालघर) याला अटक करण्यात आली होती.