स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला डिंभे धरण उजळले; विद्युत रोषणाईने साकारला आकर्षक तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 16:11 IST2023-08-14T16:09:47+5:302023-08-14T16:11:39+5:30
धरणावरील विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळी लक्षवेधी ठरत आहे

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला डिंभे धरण उजळले; विद्युत रोषणाईने साकारला आकर्षक तिरंगा
डिंभे: पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यालाही वरदान ठरलेल्या डिंभे धरणात सध्या ८४ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचे प्रमाण चांगले असून आजपर्यंत या भागात ३७५ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. सुमारे साडेतेरा टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे हे धरण सध्या भरत आले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या सांडव्यावर कुकडी पाटबंधारे विभागामार्फत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. धरणाच्या पाचही सांडव्यावर विद्युत रोषणाईतून आकर्षक तिरंगा साकारला आहे. रात्रीच्या वेळी ही रोषणाई येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून स्थानिक नागरिक ही रोषणाई पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.