Jejuri: देवासोबत भाविकांची रंगपंचमी; खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर पारंपारिक रंगोत्सव साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:07 IST2025-03-19T16:06:03+5:302025-03-19T16:07:56+5:30
जेजुरीगडावरील रंगपंचमीमध्ये देवासोबत भाविकांनाही रंगपंचमीचा आनंद घेता येत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण

Jejuri: देवासोबत भाविकांची रंगपंचमी; खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर पारंपारिक रंगोत्सव साजरा
बी. एम. काळे
जेजुरी: दरवर्षी प्रमाणे सोमवारी सकाळी जेजुरगडावर नित्य सेवेकरी पुजारी आणि कर्मचारी वर्ग यांच्याकडून रंगपंचमी साजरी करण्यात आली. जेजुरीगडावरील रंगपंचमीमध्ये देवासोबत भाविकांनाही रंगपंचमीचा आनंद घेता येत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. श्रीमल्हारी मार्तंडाचे पंतप्रधान विष्णूंचे अवतार हेगडी प्रधान यांचा शुभविवाह याच दिवशी लक्ष्मी देवी सोबत होत असल्याने रंगपंचमीला खंडेरायाच्या उपासनेमध्ये विशेष महत्व आहे.
फाल्गुन कृष्ण पक्ष प्रतिपदा अर्थात धूलिवंदन पासून वसंतोत्सवाला सुरुवात होते आणि रंगपंचमी पर्यंत हा उत्सव सुरु असतो. वसंत ऋतू मध्ये निसर्ग विविधरंगी फुलांच्या माध्यमातून रंगाची उधळण करीत असतो. तर दुसरीकडे होळी नंतर उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. अशा वातावरणात एकरूप होण्यासाठी रंगपंचमीचा सण साजरा करण्याची आपली परंपरा आहे. चंदनाची शीतलता, नैसर्गिक रंगांसोबत पाण्याच्या शिडकाव्यामुळे उन्हाळ्याच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठीच हिंदू संस्कृतीमध्ये धुळवड ते रंगपंचमी सारख्या उत्सवाची परंपरा आहे. या परंपरेला साजेसाच रंगपंचमी उत्सव जेजुरीगड मंदिरामध्ये दरवर्षी साजरा केला जातो.
पहाटे तोंडधूनी पूजेच्या वेळी श्रीखंडोबा म्हाळसादेवी स्वयंभू लिंगावर नित्य नियमाप्रमाणे पारंपरिक भूपाळीच्या स्वरात पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सुगंधित जल, विविधरंगी क्षीराभिषेक आणि जलाभिषेक करण्यात आला. श्रीखंडोबा-म्हाळसा स्वयंभू लिंगावर चंदन उटीचे लेपन केले व त्याच्यावर विविध रंगात आकर्षक सजावट करण्यात आली. त्यानंतर स्वयंभू लिंग, श्रीमार्तंडभैरव मूर्ती आणि उत्सव मूर्तींवर शीतल रंगीत जल शिंपडण्यात आले. त्यानंतर दर्शनासाठी आलेले भाविक नित्य वारकरी, कर्मचारी आणि पुजारी यांच्यावर विविध रंगांचे शिंपण करण्यात आले.