सासवड, जेजुरी, फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपालिकांच्या विकासकामांचा मिळणार गती; माधुरी मिसाळ यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 13:58 IST2025-10-11T13:57:22+5:302025-10-11T13:58:42+5:30
या बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि कर्मचारी कमतरता यांसारख्या मूलभूत सुविधांवर चर्चा झाली

सासवड, जेजुरी, फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपालिकांच्या विकासकामांचा मिळणार गती; माधुरी मिसाळ यांचे आश्वासन
सासवड : नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, माजी आमदार संजय जगताप आणि भाजपा नेते बाबा जाधवराव यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी पुणे येथे सासवड, जेजुरी आणि नवनिर्मित फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपालिकांमधील प्रलंबित विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि कर्मचारी कमतरता यांसारख्या मूलभूत सुविधांवर चर्चा झाली.
माजी आमदार संजय जगताप यांनी सासवड आणि जेजुरीच्या भुयारी गटार योजना, पाणीपुरवठा योजना, १५व्या वित्त आयोगाचा निधी, बांधकाम निकष कमी करणे, जेजुरीची हद्दवाढ, कर आकारणी, नागरिकांच्या समस्या आणि निधीची कमतरता यावर राज्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तसेच, फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपालिकेच्या व्यवस्थापनातील अडचणी आणि नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांबाबतही चर्चा झाली.
जेजुरी नगरपालिकेत चाळीसगाव येथून आलेल्या ‘क’ आणि ‘ड’ वर्ग कर्मचाऱ्यांचे जवळच्या नगरपालिकेत स्थलांतर करून स्थानिक कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या मागणीवरही चर्चा झाली. याशिवाय, फुरसुंगी नगरपालिकेतील कर्मचारी कमतरतेचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली. १५व्या वित्त आयोगासह स्वच्छ भारत योजनेचा निधी, तसेच पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिकेने निधी उपलब्ध करून देण्याची विनंतीही या बैठकीत करण्यात आली.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व चर्चा आणि समस्यांची नोंद घेत लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. प्रशासकीय पातळीवर आवश्यक निधीची पूर्तता आणि नागरिकांना उत्तम सोयी-सुविधा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीला सासवडचे माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा वीणा सोनवण, अजिंक्य देशमुख, माजी उपनगराध्यक्ष यशवंतराव जगताप, सुहास लांडगे, मनोहर जगताप, संदीप जगताप, विजय वढणे, भाजपाचे सचिन पेशवे, मयूर जगताप, साकेत जगताप, आनंद जगताप, डॉ. सुमित काकडे, भारत चौखंडे, हेमंत सोनवणे, विश्वजित आनंदे, हिरामण हिवरकर, संतोष गिरमे, तुषार जगताप, दोन्ही नगर परिषदांचे माजी नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.