पुणे आता ड्रग्सचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होतंय; जगतापांचा आरोप, शरद पवार गटाचे आंदोलन
By निलेश राऊत | Updated: May 24, 2024 16:03 IST2024-05-24T16:01:07+5:302024-05-24T16:03:39+5:30
पुण्यात कायदा, सुव्यवस्थेची दुरवस्था झाली असून राजकीय हस्तक्षेपामुळे परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चाललीये

पुणे आता ड्रग्सचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होतंय; जगतापांचा आरोप, शरद पवार गटाचे आंदोलन
पुणे: "हिट अँड रन" प्रकरणामुळे आणि हे प्रकरण हाताळत असताना झालेल्या अक्षम्य चुकांमुळे पुणे शहराची संपूर्ण देशात नाचक्की झाली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेची झालेली दुरवस्था, पोलीस प्रशासनात अवास्तव राजकीय हस्तक्षेप यामुळे परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ( शरद पवार गट) जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी सकाळी आंदोलन करण्यात आले.
कधीकाळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, अशी ओळख असलेले आपले पुणे शहर आता हिट अँड रन सिटी, ड्रगचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होत असल्याचा आरोप यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.
या आंदोलनावेळी कोयता गँगची दहशत, शहरात नेहमीच घडणाऱ्या गोळीबाराच्या घटना, अमली पदार्थांचा सुळसुळाट, अनधिकृत पब आणि बारवर असलेला प्रशासनाचा वरदहस्त अशा अनेक बाबींचा निषेध करण्यात आला. "गृहमंत्री जागे व्हा, तिघाडी सरकार जागे व्हा" अशा घोषणा देत पुणे जिल्हाधिकारी यांना पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले.