Pune Crime: कात्रजमध्ये दरोड्याच्या तयारीतील सराईत ताब्यात; कोयता, मिरची पूड जप्त
By नितीश गोवंडे | Updated: April 18, 2024 18:26 IST2024-04-18T18:24:47+5:302024-04-18T18:26:03+5:30
सराईताबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे...

Pune Crime: कात्रजमध्ये दरोड्याच्या तयारीतील सराईत ताब्यात; कोयता, मिरची पूड जप्त
पुणे : कात्रज भागात दरोड्याच्या तयारीतील सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. सराईताबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून कोयता, मिरची पूड जप्त करण्यात आली.
उदय महेश भोसले (रा. एसआरए बिल्डिंग, लेकटाऊन, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिस हवालदार चेतन गोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसलेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. भोसले आणि अल्पवयीन साथीदार कात्रजमधील लेकटाऊन परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला. पोलिसांच्या पथकाने भोसलेसह अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोयता आणि मिरची पूड जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वर्षा तावडे करत आहेत.