अजितदादांची परंपरा सुनेत्रा पवारांनी जपली; सकाळी लवकर बारामती जिल्हा परिषदेसाठी मतदान केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 09:39 IST2026-02-07T09:36:11+5:302026-02-07T09:39:19+5:30
Deputy CM Sunetra Ajit Pawar ZP Election 2026: अजितदादा मतदान करण्यासाठी सकाळीच संबंधित केंद्रावर जायचे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांची हीच परंपरा कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले.

अजितदादांची परंपरा सुनेत्रा पवारांनी जपली; सकाळी लवकर बारामती जिल्हा परिषदेसाठी मतदान केले
Deputy CM Sunetra Ajit Pawar ZP Election 2026: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. अजित पवार यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनवर साध्या पद्धतीने झाला. यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी अजितदादांची परंपरा कायम राखली. सकाळी लवकर मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
संपूर्ण राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे या निवडणुकीचे मतदान पुढे ढकलण्यात आले होते. बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. याच जिल्हा परिषदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला विमानाने येत होते. बारामती विमानतळावर विमान उतरत असताना झालेल्या भीषण अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या दुःखातून बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनता अद्यापही सावरलेली दिसत नाही. यातच अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरी जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
अजितदादांची परंपरा सुनेत्रा पवारांनी जपली
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांची एक परंपरा जपली आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी लवकरच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे मतदानासाठी पोहोचले. या दोघांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार हे कायमच सकाळी लवकर कामाला सुरुवात करायचे. अजितदादा मतदानालाही सकाळीच मतदान केंद्रावरच पोहोचायचे. सुनेत्रा पवार यांनी अजितदादांची हीच परंपरा कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, युगेंद्र पवार, शर्मिला पवार आणि राजेंद्र पवार यांनी बारामतीच्या कन्हेरी जिल्हा परिषद शाळेत मतदान केले. यंदाची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे, असे म्हटले जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार पूर्णपणे थंडावला होता. केवळ वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात आला होता. त्यामुळे आता मतदार कोणाच्या पारड्यात दान टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.