आयकर विभागाच्या छाप्यानं अजित पवारांना काही फरक पडणार नाही; रामदास आठवले यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 18:54 IST2021-10-19T18:59:18+5:302021-10-21T18:54:41+5:30
रामदास आठवले यांनी आज पुण्यात बोलताना विविध विषयांबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

आयकर विभागाच्या छाप्यानं अजित पवारांना काही फरक पडणार नाही; रामदास आठवले यांचं विधान
पुणे: आयकर विभागाच्या छाप्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही फरक पडणार नाही, असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच आयकर विभाग, ईडी, सीबीआय यासारख्या यंत्रणांकडून सुरू असणाऱ्या चौकशीमागे केंद्राचा कोणताही हात नाही, असं स्पष्टीकरण देखील रामदास आठवले यांनी यावेळी दिलं आहे.
रामदास आठवले यांनी आज पुण्यात बोलताना विविध विषयांबाबत आपले मत व्यक्त केले आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ले करण्याचा डाव रचला जातोय. तिथे काम करणार्या मजुरांवर आतंकवादी हल्ले सुरू आहेत. अनेकजण उद्योग करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये येत असतात त्यांना आतंकवादी ठार मारत आहेत, असं रामदास आठवले यांनी सांगितलं. तसेच पाकिस्ताचे फार लाड करून चालणार नाही. पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे, असं मतही रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.
भारत पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ नये-
भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळू नये असे माझ्या पक्षाचे मत आहे. खेळामध्ये राजकारण आणू नये हे जरी खरे असले तरी अशा परिस्थितीत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळू नये असे माझे मत आहे, असंही रामदास आठवले यांनी म्हणाले.
आरपीआय असताना भाजपला मनसेची गरज नाही-
आरपीआय असताना भाजपला मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपचे नुकसान होऊ शकते. त्यांचा परप्रांतियांचा मुद्दा भाजपला नुकसानकारक ठरेल. भाजपने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये, आम्ही भाजपचा नाद सोडला तर ते आमचा नाद सोडणार नाहीत, असा इशारा देखील त्यांनी या वेळी दिला आहे.