कामावरून काढून टाकल्याने नैराश्य; एकाने उचलले टोकाचे पाऊल, दोघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:06 IST2025-11-08T18:06:18+5:302025-11-08T18:06:35+5:30
पतीला कामावरून काढून टाकल्याने ते नैराश्यात होते, तसेच आरोपींच्या त्रासामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पत्नीने सांगितले आहे

कामावरून काढून टाकल्याने नैराश्य; एकाने उचलले टोकाचे पाऊल, दोघांविरोधात गुन्हा दाखल
पुणे : कामावरून कमी केल्याने एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक बोबडे (५०, रा. प्रेस्टिज पॅसिफिक सोसायटी, दळवीनगर, आंबेगाव, कात्रज) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत दीपक बोबडे यांची पत्नी स्वाती (४५) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अजित जाधव आणि रवींद्र राऊत या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती बोबडे यांचे पती एका खासगी कंपनीत कामाला होते. आरोपींनी दिलेला त्रास, तसेच त्यांना कामावरून कमी केल्याने ते नैराश्यात होते. गेल्या महिन्यात ६ ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेल्या एका लाॅजमध्ये दीपक यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांची पत्नी स्वाती यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पतीला कामावरून काढून टाकल्याने ते नैराश्यात होते, तसेच आरोपींच्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी फिर्यादीत केला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.