डेंग्यूच्या रुग्ण संख्येत घट! राज्यात १५९०, तर चिकुनगुन्याचे ७४१ रुग्ण; एकही मृत्यूची नोंद नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 09:49 IST2025-05-22T09:49:09+5:302025-05-22T09:49:19+5:30
नागरिकांनी घरातील पाण्याच्या टाक्या, भांडी आठ दिवसांतून एकदा कोरड्या करून स्वच्छता करावी, घराभोवती डासोत्पतीस करणीभूत नारळाची करवंटे, टायर, डबे व अडगळीच्या वस्तू वेळीच नष्ट करावे.

डेंग्यूच्या रुग्ण संख्येत घट! राज्यात १५९०, तर चिकुनगुन्याचे ७४१ रुग्ण; एकही मृत्यूची नोंद नाही
पुणे : राज्यात २०२४ (मे अखेर) च्या तुलनेत २०२५ (१४ मे अखेर) मध्ये डेंग्यूच्या रुग्ण संख्येत घट झाली असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून निदर्शनास आले. या काळात डेंग्यूमूळे एकही मृत्यू नसल्याची नोंद दिलासादायक आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये डेंग्यूच्या रुग्णसंखेत वाढ झाल्याची नोंद असली तरी या काळात मृत्यू संख्येत घट झाली आहे. आरोग्य विभागाने राज्यातील डेंग्यू आणि चिकुनगुन्याच्या रुग्णांची २०२३ पासून १४ मे २०२५ पर्यंतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यात १४ मे २०२५ अखेर डेंग्यूच्या २२,३४० तपासण्यांद्वारे १,५९० रुग्णांना डेंग्यूचे निदान झाले आहे. तर याच काळात चिकुनगुन्याच्या एकूण १२,२६४ तपासण्यांमधून चिकुनगुन्याचे ७,४१ रुग्ण आढळून आले, यात एकाही मृत्यूची नोंद नाही.
डेंग्यू हा विषाणूजन्य रोग आहे. याचा प्रसार डेंग्यू विषाणू दूषित एडिस इजिप्ती प्रकारातील डासाच्या मादीमार्फत होतो. हा डास चावल्यानंतर साधारणपणे ५ ते ६ दिवसांत डेंग्यू तापाची लक्षणे दिसू लागतात. याचे साधारण डेंग्यू ताप, रक्तस्रावयुक्त डेंग्यू ताप व डेंग्यू शॉक सिंड्रोम असे तीन प्रकार आहेत. डेंग्यू ताप हा फ्ल्यूसारखा आजार आहे. रक्तस्रावयुक्त डेंग्यू ताप व डेंग्यू शॉक सिंड्रॉम हा तीव्र प्रकारचा आहे. यामध्ये मृत्यूही होण्याची शक्यता असते. चिकुनगुन्याच्या विषाणूचा प्रसारही डासांपासून होतो. यात ताप, डोकेदुखी, उलटी, मळमळ, अंगावर चट्टे उमटणे, सांधेदुखी आदी लक्षणे दिसतात. राज्यात १४ मे २०२५ अखेर पर्यंत सर्वाधिक नोंद झालेल्या डेंग्यूच्या रुग्णांची जिल्हानिहाय संख्या पालघर-११६, पुणे-९९, अकोला-८७, सिंधुदूर्ग-६६, नाशिक- ४६ अशी आहे. तर महापालिकानिहाय ही आकडेवारी बृहन्मुंबई - ३११, नाशिक-१०८, अकोला-१०२, मालेगाव-५८, कोल्हापूर- २८ अशी आहे.
राज्यातील काही जिल्हा व महापालिका हद्दीत चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. १४ मे २०२५ अखेरपर्यंत सर्वाधिक नोंद असलेल्या चिकुनगुन्याच्या रुग्णांची जिल्हानिहाय संख्या पुणे- ७७,अकोला-६४, पालघर-४७, सिंधुदुर्ग-४४, ठाणे- ३५ अशी आहे, तर महापालिकानिहाय ही आकडेवारी बृहन्मुंबई-१०२, अकोला-८२, सांगली-मिरज-२१, नाशिक-१३, ठाणे- ११ अशी आहे. डेंग्यू व चिकुनगुन्याच्या निदानासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील सेंटीनल सेंटरमध्ये रक्त नमुने मोफत तपासले जातात.
आरोग्य कर्मचारी, आरोग्य व आशा सेविकांमार्फत ताप रुग्णांचे सर्वेक्षण केले जाते. रुग्णांचे रक्तनमुने घेऊन संशयित रुग्णांना गृहितोपचार, तर तपासणीत आढळणाऱ्या बाधित रुग्णांना पूर्ण कालावधीचा उपचार दिला जातो. संशयित ताप रुग्णांचे रक्तजल नमुने एनआयव्ही किंवा राज्यातील निवडक ५० सेंटीनल सेंटरकडे विषाणू परीक्षणासाठी पाठविले जातात. डासांचे नमुनेही विषाणूंचा प्रकार ओळखण्यासाठी तपासणीसाठी पाठविले जातात. नागरिकांनी घरातील पाण्याच्या टाक्या, भांडी आठ दिवसांतून एकदा कोरड्या करून स्वच्छता करावी. घराभोवती डासोत्पतीस करणीभूत नारळाची करवंटे, टायर, डबे व अडगळीच्या वस्तू वेळीच नष्ट करावे. विशेषत: दिवसाच्या वेळेस डास चावू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. - डॉ. बबिता कमलापूरकर, सहसंचालक, आरोग्यसेवा (हि.ह.व ज.रोग)