Demand for release of water in Indapur taluka by canal : water supply by tanker | कालव्यातून इंदापूर तालुक्यात पाणी सोडण्याची मागणी : टँकरने पाणीपुरवठा सुरूच

कालव्यातून इंदापूर तालुक्यात पाणी सोडण्याची मागणी : टँकरने पाणीपुरवठा सुरूच

ठळक मुद्दे खासदार सुळे, आमदार भरणे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कळस : इंदापूर तालुक्यामध्ये या वर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे खडकवासला कालव्यामधून इंदापूर तालुक्यातील पाझर तलावात तातडीने पाणी सोडण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत आमदार दत्तात्रेय भरणे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.
इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी, डाळज, मदनवाडी, कळस, तरंगवाडी, भादलवाडी, अकोले, वडापुरी, झगडेवाडी, बळपुडी, रुई, पोंधवडी या गावांचे पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत पूर्णपणे आटले असून पिण्याचे पाणी पुरवणे शक्य नाही. या गावांच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संबंधित गावालगत असलेल्या तळ्यांमध्ये खडकवासला कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याबाबत लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 
इंदापूर तहसीलदार व बारामती उपविभागीय अधिकारी यांनीही तलावात पाणी सोडण्याची शिफारस केली आहे. याबाबत आमदार भरणे यांनी खासदार सुळे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन सदर मागणीचे लेखी निवेदन दिले.
तालुक्यातील तलाव खडकवासला कालव्याद्वारे तातडीने भरण्याची आग्रही मागणी करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याची  मागणी केली आहे. या वेळी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. डी. चोपडे यांनाही निवेदनाच्या मागणीचे पत्र देण्यात आले. तसेच, या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तांबिले, हनुमंत वाबळे, दत्तात्रेय घोगरे, झगडेवाडीचे सरपंच अतुल झगडे, वसंत आरडे, लक्ष्मण जगताप आदीं उपस्थित होते.
.....
गलांडवाडी, डाळज, मदनवाडी, कळस, तरंगवाडी, भादलवाडी, अकोले, वडापुरी, झगडेवाडी, बळपुडी, रुई, पोंधवडी या गावांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या गावांच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संबंधित गावालगत असलेल्या तळ्यांमध्ये खडकवासला कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

 

Web Title: Demand for release of water in Indapur taluka by canal : water supply by tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.