वयाच्या मर्यादा झुगारून, परिस्थितीशी झगडत २५ वर्षांनंतर दहावीची परीक्षा; सीमा यांच्या मेहनतीला यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:59 IST2025-05-13T18:57:45+5:302025-05-13T18:59:18+5:30
अनुभव आहे, पण शिक्षण नव्हतं म्हणून मागे राहिल्यासारखे वाटायचे, सध्याच्या काळात माणसांचे शिक्षणचं ही ओळख आहे

वयाच्या मर्यादा झुगारून, परिस्थितीशी झगडत २५ वर्षांनंतर दहावीची परीक्षा; सीमा यांच्या मेहनतीला यश
पुणे : वयाच्या मर्यादा झुगारून, परिस्थितीशी झगडत सीमा सरोदे यांनी तब्बल २५ वर्षांनंतर दहावीची परीक्षा दिली आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले आहे. घर, संसार, जबाबदाऱ्या आणि आयुष्यात आलेले चढ-उतार यामध्ये शिक्षण अपूर्ण राहिलं होतं. दहावीपर्यंतचेशिक्षण पूर्ण करण्यासाठी दोन वेळा अर्ज देखील भरले. मात्र, कामामुळे ते तेव्हा राहून गेले. त्यानंतर खूप विचार करून दोन वर्षांपूर्वी ठाम निर्णय घेतला आणि दहावी पूर्ण करण्याचा निश्चय केला. दिवसा काम आणि रात्री शिक्षण असे करत ५५.८८ टक्के मिळवत यश संपादन केले आहे.
सीमा सरोदे सांगतात, २००० साली दहावीची परीक्षा काही कारणामुळे देता आली नाही. त्यानंतर दोन वेळा प्रयत्न केला, पण तेव्हाही जमले नाही. यंदा मात्र घरातील प्रत्येकाच्या पाठिंब्यामुळे मला प्रेरणा मिळाली आणि उत्तीर्ण झाले. अनेकवेळा मला अभ्यासासाठी कामामुळे वेळ मिळाला नाही. जमले तसा अभ्यास सुरू ठेवला आणि आज २५ वर्षांनंतर दहावीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या सर्वांमध्ये शिकायचे स्वप्न मात्र मनात जिवंत होते. त्याच स्वप्नाला उराशी धरत, पुन्हा पुस्तके उचलली, अभ्यासाला सुरुवात केली आणि दहावीची परीक्षा दिली.
अनुभव आहे, पण शिक्षण नव्हतं म्हणून मागे राहिल्यासारखे वाटायचे. सध्याच्या काळात माणसांचे शिक्षणचं ही ओळख आहे. शाळेतील मुलांबरोबरच परीक्षेला बसणं, पुन्हा वही-पेन घेणं, अभ्यासाची शिस्त पाळणं हे सगळं त्यांनी हसत-हसत स्वीकारलं. त्यांच्या जिद्दीला फळ मिळालं आणि त्यांनी यशस्वीपणे दहावी उत्तीर्ण केली. पुढील कोर्स आणि शिक्षणासाठी मला दहावी उत्तीर्ण होणे गरजेचे होते, असं सीमा यांनी सांगितलं. त्यांच्या या प्रवासात पती आणि कुटुंबाचा पाठिंबा, प्रेरणा आणि स्वतःची अपार जिद्द यांचा मोलाचा वाटा होता.