पाण्यात जीवघेणा विषाणू..! एका टँकरमध्ये सापडला इकोलाईल, महापालिकेची कडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 10:27 IST2025-01-31T10:26:01+5:302025-01-31T10:27:22+5:30
धायरी, नांदोशी, किरकटवाडी, नांदेड या गावांसह काही गावांमध्ये जीबीएसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले

पाण्यात जीवघेणा विषाणू..! एका टँकरमध्ये सापडला इकोलाईल, महापालिकेची कडक कारवाई
पुणे : गुईलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराच्या पार्श्वभूमीवर पाण्यांची तपासणी केली असता एका टॅंकरच्या पाण्यात इकोलाईल विषाणू आढळला आहे. त्यामुळे टँकरचालक-मालक, विहिरी व इंधन विहिरी चालकांना पाणी शुद्धिकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
धायरी, नांदोशी, किरकटवाडी, नांदेड या गावांसह काही गावांमध्ये जीबीएसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. त्यामुळे, महापालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून महापालिकेकडून खासगी टॅंकरमधील पाण्याचे नमुने घेतले जात आहेत. त्यापैकी एका टँकरमध्ये इकोलाईल विषाणू आढळला आहे. खबरदारी म्हणून पाणीपुरवठा विभागाने खासगी टँकर, खासगी विहीर, इंधन विहिरी येथे ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पाणी शुद्ध करण्यासाठीची ब्लिचिंग पावडर महापालिकेकडून पुरविण्यात येत होती. त्यानंतरही, केवळ एका टॅंकरचालकाकडून ब्लिचिंग पावडर नेण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने आता उर्वरित खासगी टॅंकरचालक, विहीरी, मालकांना नोटीस बजावली आहे.
खासगी टँकर, आरओ प्लँटमधील पाण्याचेही नमुने तपासणीसाठी घेतले आहे. महापालिकेने आता खासगी टँकर पाणी भरणा केंद्र व खासगी पाणी शुद्धिकरण प्रकल्पातील (आरओ प्लँट) पाण्याचे नमुने घेण्यास सुरुवात केली असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.