बीडचे वातावरण दादाच बदलतील; अजितदादांच्या पालकमंत्रिपदाचा पुण्यात जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 18:20 IST2025-01-20T18:19:06+5:302025-01-20T18:20:10+5:30
पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रकल्पांना गती मिळून विकास होईल, दादांची कार्यक्षमता अफाट आहे

बीडचे वातावरण दादाच बदलतील; अजितदादांच्या पालकमंत्रिपदाचा पुण्यात जल्लोष
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे व बीड अशा दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री झाले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुण्यात सोमवारी जल्लोष केला. पक्षाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनासाठी शिर्डी मुक्कामी असलेले कार्यकर्ते आज परतले व पक्ष कार्यालयासमोर त्यांनी ढोल-ताशे वाजवत आनंद व्यक्त केला.
शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक दत्ता सागरे, रूपाली ढोंबले व अन्य अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. गुप्ते मंगल कार्यालयाजवळच्या पक्ष कार्यालयासमोरच एकत्र जमून सर्वांनी जल्लोष केला. एकमेकांना जिलेबी, पेढे भरविण्यात आले. मानकर यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्याच्या व शहराच्याही विकासासाठी ही मोठी गोष्ट आहे. दादांची कार्यक्षमता अफाट आहे. त्यामुळे आता इथल्या अनेक मोठ्या प्रकल्पांना गती मिळेल. दादा अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आर्थिक कारणावरून इथली कामे अडणार नाहीतच, पण अशा मोठ्या कामांना प्रशासकीय गती देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते, ती दादांकडे भरपूर आहे. त्याशिवाय आता पुण्यात काही नवे प्रकल्पही येतील, असे मानकर म्हणाले.
कार्याध्यक्ष देशमुख यांनी दादांकडे दुहेरी जबाबदारी आली. यावरूनच त्यांची कार्यक्षमता सिद्ध होते, असे सांगितले. बीडमधील वातावरण दादा नक्कीच चांगले करतील, तेथील जनतेला विश्वास देतील, अशी खात्री देशमुख यांनी व्यक्त केली. पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पुण्यात येतील त्यावेळी त्यांचे असेच जल्लोषात स्वागत करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.