पुण्यात सीमाशुल्क विभागाने पकडले पावणे दोन कोटींचे एमडी; तब्बल ८९८ ग्रॅम ९४ मिलीग्रॅम मेफेड्रॉन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 14:54 IST2026-03-13T14:53:34+5:302026-03-13T14:54:09+5:30
आरोपी मूळचा राजस्थान येथील असून सध्या तो सणसवाडी परिसरातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहत होता आणि तेथूनच मेफेड्रॉनची विक्री करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे

पुण्यात सीमाशुल्क विभागाने पकडले पावणे दोन कोटींचे एमडी; तब्बल ८९८ ग्रॅम ९४ मिलीग्रॅम मेफेड्रॉन जप्त
पुणे: जिल्ह्यातील सणसवाडी परिसरात सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) अंमली पदार्थविरोधी पथकाने धडक कारवाई करत विक्रीसाठी बाळगलेले तब्बल १ कोटी ७९ लाखांहून अधिक रकमेचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले. सणसवाडी येथील फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात तब्बल ८९८ ग्रॅम ९४ मिलीग्रॅम मेफेड्रॉन जप्त करत राजस्थानच्या ड्रग तस्कराला बेड्या ठोकल्या.
दोन वर्षांपूर्वी कुरकुंभ येथील ड्रग कारखान्यावरील कारवाईनंतर पहिल्यांदाच पुणे ग्रामीण औद्योगिक पट्ट्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सागरमल ऊर्फ सागर बिश्नोई (वय २६, रा. जोधपूर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात कस्टम विभागाचे महेंद्र पांचाल यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी मूळचा राजस्थान येथील असून सध्या तो सणसवाडी परिसरातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहत होता आणि तेथूनच मेफेड्रॉनची विक्री करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
अंमली पदार्थांची विक्री करणारा एक तरुण सणसवाडी परिसरात राहत असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीची पडताळणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पंचांसमवेत ११ मार्चच्या रात्री उशिरा संबंधित सोसायटीतील फ्लॅटवर छापा टाकण्याचे नियोजन केले. अधिकारी फ्लॅटवर पोहोचल्यानंतर दार ठोठावले असता एक तरुण बाहेर आला. त्याची ओळख पटवून अधिकाऱ्यांनी त्याला शोध परवानगी दाखवली आणि फ्लॅटची तपासणी सुरू केली. ४०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या या फ्लॅटमध्ये एक हॉल, एक बेडरूम, स्वयंपाकघर आणि गॅलरी होती. फ्लॅटमध्ये फारसे फर्निचर नव्हते. तपासणीदरम्यान बेडरूममध्ये ठेवलेल्या गुलाबी रंगाच्या बॅगेत संशयास्पद वस्तू आढळल्या. अधिकाऱ्यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यात ऑफ व्हाईट रंगाची पावडर असलेल्या सहा प्लास्टिक पिशव्या सापडल्या. तपासणी केल्यानंतर ती पावडर मेफेड्रॉन (एमडी) असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे एकूण वजन ८९८ ग्रॅम ९४ मिली ग्रॅम असल्याचे आढळले. याशिवाय त्या बॅगेतून लहान प्लास्टिक पिशव्या, दोन छोटे चमचे तसेच इलेक्ट्रॉनिक वजनकाटाही जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपीने मेफेड्रॉन लहान-लहान प्रमाणात पॅक करून ग्राहकांना विक्रीसाठी देत असल्याचे सांगितल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
या प्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली. त्याला कस्टम विभागाने विशेष न्यायालयात हजर केले. विशेष सरकारी वकील ऋषीराज वाळवेकर यांनी आरोपीने मेफेड्रॉनचा साठा कुठून आणला, तसेच तो कोणाला पुरवठा करत होता याचा तपास करण्यासाठी व अमली पदार्थांच्या व्यवहारामागील इतर साथीदारांचा शोध घेऊन जाळे उघड करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) एस. जी. जोशी यांनी १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास कस्टम विभागातील अमली पदार्थ विरोधी पथक करत आहे.