रस्त्यावरील पाण्यात करंट, बारा वर्षाच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, हडपसरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 13:13 IST2024-05-12T13:12:55+5:302024-05-12T13:13:16+5:30
मुलगा सायंकाळी पाऊस सुरू असताना खाऊ आणण्यासाठी मित्रांबरोबर बाहेर पडला होता

रस्त्यावरील पाण्यात करंट, बारा वर्षाच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, हडपसरमधील घटना
हडपसर : हडपसर परिसरात रस्त्यावर साचलेल्या पाण्यात विजेचा करंट उतरला. त्याच पाण्यातून पायी निघालेल्या बारा वर्षीय मुलाला विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. ही घटना हँडबॉल स्टेडियमसमोरील चौकात घडली. ही घटना शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. रोहित सुभाष मंडाळकर असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.
रोहित हा मूळचा सोलापूरचा आहे. त्याचे आई-वडील बिगारी कामासाठी पुण्यात आले. सध्या ते हडपसर परिसरात भाड्याने राहतात. सायंकाळी पाऊस सुरू असताना खाऊ आणण्यासाठी मित्रांबरोबर बाहेर पडला. वाटेत असणाऱ्या विरंगुळा केंद्राजवळ रस्त्यावर साचलेल्या पाण्यात विजेचा करंट उतरला होता. काही नागरिकांना येथे विजेचा धक्का बसल्याने ते बाजूला झाले. मात्र, हा पळत पळत गेल्याने त्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने खाली पडला. त्याचवेळी तेथून प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकाने प्रवासी उतरून त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर त्याला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही आणि त्याचा मृत्यू झाला.