सप्टेंबरमध्ये पुणे जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ५३ हजार शेतकऱ्यांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 10:53 IST2025-10-15T10:53:10+5:302025-10-15T10:53:43+5:30
या नुकसानीपोटी ३४ कोटी ६१ लाख रुपयांच्या मदतीची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे

सप्टेंबरमध्ये पुणे जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ५३ हजार शेतकऱ्यांना फटका
पुणे : जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १० तालुक्यांमधील सुमारे २२ हजार हेक्टरवरील पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. एकूण ७८१ गावांमधील तब्बल ५३ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाने केलेल्या पंचनाम्यांमधून ही बाब स्पष्ट झाली असून, या नुकसानीपोटी ३४ कोटी ६१ लाख रुपयांच्या मदतीची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. सर्वाधिक ११ हजार ७०० हेक्टरवरील नुकसान इंदापूर तालुक्यात झाले असून, याचा फटका सुमारे २४ हजार शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.
पुणे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने तब्बल १० तालुक्यांना फटका बसला. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यासह तीन तालुक्यांमध्ये शेतजमीन खरवडून निघाली. या नुकसानीचे पंचनामे कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाने एकत्रितरीत्या केले. त्यानुसार जिल्ह्यात १० जिल्ह्यांमध्ये २१ हजार ९५१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर ३ तालुक्यांमधील ४२ हेक्टरवरील जमीन खरवडून निघाली आहे. त्यामुळे एकूण बाधित क्षेत्र २१ हजार ९९३ हेक्टर इतके झाले आहे. जिल्ह्यातील ७६८ गावांमध्ये पिकांचे नुकसान नोंदविण्यात आले असून, ५२ हजार ७८९ शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. तर तीन तालुक्यांमधील १३ गावांमध्ये १६८ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला फटका बसला आहे.
पंचनाम्याच्या अहवालात ९ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार पिकांच्या नुकसानीसाठी ३४ कोटी ४२ लाख ८८ हजार रुपयांच्या मदतीची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. त्यासह जमीन खरवडून गेल्याने १८ लाख ७५ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. एकूण नुकसान ३४ कोटी ६१ लाख ६३ हजार इतके झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान इंदापूर तालुक्यात झाले असून, येथे ११ हजार ६९६ हेक्टरवर पिके बाधित झाली आहेत. याचा फटका २७ हजार ३०४ शेतकऱ्यांना बसला आहे. त्याखालोखाल पुरंदर तालुक्यातील २ हजार ७६१ हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून, यामुळे ८ हजार ४५६ शेतकरी बाधित झाले आहेत.
नुकसान प्रकार--बाधित गावे--शेतकरी-- क्षेत्र (हेक्टरमध्ये)--नुकसान रक्कम (कोटींत)
पिके--७६८---५२७८९--२१९५१.९४---३४.४२
जमीन--१३--१६८--४१९१--०.१८
एकूण--७८१--५२९७५--२१९९३.८५--३४.६२