Video : दौंडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ...! ४ चोर आले, चक्क ATM च घेऊन गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 17:21 IST2026-03-02T17:14:33+5:302026-03-02T17:21:33+5:30
दरवाजाचे लॉक व लोखंडी जाळी तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. घरातील सदस्यांना आवाज आल्याने त्यांनी तत्काळ आरडाओरडा केल्याने चोरटे पसार झाले.

Video : दौंडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ...! ४ चोर आले, चक्क ATM च घेऊन गेले
वरवंड (ता. दौंड) : दौंड तालुक्यातील वरवंड, कुसेगाव व पडवी परिसरात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. घरफोडी, दुचाकी चोरीचे प्रयत्न आणि सर्वात गंभीर म्हणजे वरवंड येथील एटीएम मशीनच उचलून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार वरवंड येथील एका घराच्या सेफ्टी डोअरची तोडफोड करून आत घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरवाजाचे लॉक व लोखंडी जाळी तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. घरातील सदस्यांना आवाज आल्याने त्यांनी तत्काळ आरडाओरडा केल्याने चोरटे पसार झाले. या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओत परिसरातील दोन दुचाकींचे लॉक तोडण्याचा प्रयत्नही या चोरटयांनी केल्याचे दिसते. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि ग्राम सुरक्षा दलाला माहिती देण्यात आल्याने चोरट्यांचा डाव फसला. दरम्यान, एटीएम मशीनच चोरट्यांनी वाहनातून उचलून नेल्याची माहिती समोर येत आहे.
#CrimeNews : दौंडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ...! चक्क ATMचं चोरट्यांनी पळवलं #pune#MaharashtraNewspic.twitter.com/ucBmis7kSm
— Lokmat (@lokmat) March 2, 2026
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून कुसेगाव-पडवी भागात चार संशयित फिरताना दिसल्याची माहिती आहे. संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
नागरिकांकडून गस्त वाढवण्याची मागणी
सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.