Crime News: आळंदीत संशयातून घडला दुहेरी खून; आरोपी ५ तासांत जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:30 IST2026-04-03T11:25:44+5:302026-04-03T11:30:54+5:30
ठाकरवाडी भागात घडलेल्या चिमुरडीसह वृद्धेच्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या पाच तासांत उलगडा करत आरोपीला अटक केली आहे.

Crime News: आळंदीत संशयातून घडला दुहेरी खून; आरोपी ५ तासांत जेरबंद
आळंदी - तीर्थक्षेत्र आळंदी परिसरातील केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी भागात घडलेल्या चिमुरडीसह वृद्धेच्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या पाच तासांत उलगडा करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी विनायक तुकाराम भवारी (वय ३२, रा. सिन्नर) याला आळेफाटा येथून ताब्यात घेण्यात आले. त्याने सहा वर्षीय धनश्री केदारी आणि तिची देखभाल करणाऱ्या ७९ वर्षीय मंगल शिंदे यांच्या हत्येची कबुली दिली आहे.
पोलीस तपासात उघड झाले की, आरोपी आणि फिर्यादी संगीता केदारी यांची दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ओळख होऊन नंतर विवाह झाला होता. मात्र, अलीकडील काळात त्यांच्यातील नात्यात तणाव वाढला होता. घरात येण्यास विरोध, तसेच नातेसंबंध तोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा संशय आरोपीला होता. याच रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
घटनेच्या रात्री संगीता केदारी कामानिमित्त बाहेर असताना आरोपीने घरात प्रवेश करून झोपेत असलेल्या चिमुरडीचा गळा आवळला, तर वृद्धेवर प्राणघातक हल्ला केला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आळंदी पोलीस आणि क्राईम ब्रँचने तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या आधारे आरोपीचा माग काढत अवघ्या पाच तासांत त्याला अटक करण्यात आली.
कौटुंबिक वादातून आणि संशयातून हे हत्याकांड घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. - भीमा नरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आळंदी