बिबट्याला आवरण्यासाठी पुण्यात ४ जंगलांची निर्मिती; कायमच्या मुक्कामाची सोय, वनविभाग अधिकाऱ्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 19:30 IST2025-11-27T19:29:33+5:302025-11-27T19:30:47+5:30

शिरूर, जुन्नर व मंचरमध्ये ही जंगले तयार होणार असून त्यासाठी जागा आणि त्याचा प्रस्तावही तयार आहे, त्यावर आता सरकारी मंजूरीच्या वनखात्याला प्रतिक्षा आहे.

Creation of 4 forests in Pune to contain leopards; Permanent shelter facility, claims forest department official | बिबट्याला आवरण्यासाठी पुण्यात ४ जंगलांची निर्मिती; कायमच्या मुक्कामाची सोय, वनविभाग अधिकाऱ्याचा दावा

बिबट्याला आवरण्यासाठी पुण्यात ४ जंगलांची निर्मिती; कायमच्या मुक्कामाची सोय, वनविभाग अधिकाऱ्याचा दावा

पुणे : शहरात वारंवार येणाऱ्या बिबट्यांना आवरण्यासाठी वनविभागाच्या वतीने जिल्ह्यात चार ठिकाणी जंगलांची निर्मिती करण्यात येत आहे. शिरूर तालुक्यात पिंपरखेड व न्हावरा येथे तसेच जुन्नर व मंचरमध्ये ही चार जंगले तयार होणार आहेत. त्यासाठी जागा तयार आहे, त्याचा प्रस्तावही तयार आहे, त्यावर आता सरकारी मंजूरीच्या शिक्कामोर्तबाची वनखात्याला प्रतिक्षा आहे. बिबट्यांना हा अधिवास मिळाला की त्यांचे शहरात प्रवेश करणे कमी होईल, असा दावा जुन्नरवनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी केला आहे.

या चारही ठिकाणी वनविभागाची बरीच मोठी मोकळी जागा आहे. त्या जागेचा वापर यासाठी करण्यात येईल. बिबटप्रवण क्षेत्रातच या जागा निवडण्यात आल्या आहेत. ३० ते ५० एकर असे त्यांचे क्षेत्र आहे. सध्या साधे कुरण व विस्तीर्ण मोकळे पठार असे या जागांचे स्वरूप आहे. शिरूरमधील डोंगरपायथ्याला असलेली गावे तसेच जुन्नर-मंचर येथील पाण्याचे मुबलक साठे, लपण्यासाठी उसशेती व सहजपणे वस्तीत शिरता येईल, इतके लहान अंतर यामुळे या तालुक्यांमधील गावांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार आहे. पिंपरखेड, जांबूत या गावांमध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत तीन हल्ले होऊन त्यात तीन बळी गेल्यानंतर या जंगलनिर्मितीच्या प्रस्तावाला गती मिळली आहे.

यात सर्वप्रथम ही संपूर्ण जागा तारांचे मोठे कुंपण घालून बंदिस्त केली जाईल. त्यानंतर आतील परिसरात उत्तम दर्जाचे, वेगाने वाढणारे अशा गवताचे बी लावण्यात येईल. त्याचबरोबर वेगवेगळ्या देशी वृक्षांच्या बऱ्यापैकी मोठ्या झालेल्या रोपांची लागवड येथे करण्यात येईल. त्याशिवाय वेली प्रजातीमधील वनस्पती लावल्या जातील. पाणवठे तयार करण्यात येतील. लहान-लहान दिसणारी, मात्र वेगाने वाढणारी अशी दाट वृक्षराजीही करण्यात येईल. या सगळ्या कृत्रिम लागवडीला व्यवस्थित पाणी वगैरे देत थोडी निगराणी केली की, लवकरच त्याची नैसर्गिक वाढ होऊ लागेल, त्यात सरपटणारे साप, विंचू व या प्रजातीमधील उभयचर प्राणी येतील, वाढतील असे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर ससे तसेच पक्ष्यांच्या संख्येतही नैसर्गिकपणे वाढ होईल.

या पद्धतीने जंगल तयार झाल्यावर त्यात रेस्क्यू केलेल्या (पकडलेल्या) बिबट्यांना सोडण्याचा वनविभागाचा विचार आहे. नैसर्गिकपणे खाद्य मिळाले, लपण्याच्या जागा तयार झाल्या की बिबट्याला नैसर्गिक अधिवास उपलब्ध होईल. जंगलाच्या सिमेवर बिबट्या आला तरीही त्याला बाहेर पडता येणार नाही, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. माणिकडोह (जुन्नर) मधील बिबट संवर्धन केंद्रात सध्या ४५ बिबटे नैसर्गिक अधिवासात मात्र बंदिस्त आहेत. तिथेच याच प्रकारचे दुसरे एक केंद्रही तयार होत आहे. मात्र त्यापेक्षाही जंगलांसारख्याच वातावरणाचा आनंद देणारी ही तयार जंगले बिबट्यांसाठी जास्त उपयुक्त व मानवी वस्तीसाठी सुरक्षा देणारी ठरतील असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

खाद्याच्या कमतरतेमुळे बिबटे थोडेसे बिथरले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या अधिवासाच्या बाहेर येतात. त्यांना त्यांचा हरवलेला अधिवास परत मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. वनविभागाच्या वतीने अशा पद्धतीने जंगल तयार केले जातेच, इथे ते खास बिबट्यांसाठी म्हणून तयार केले जात आहे.- प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक, जुन्नर वनविभाग

Web Title : पुणे में तेंदुए के लिए चार जंगलों का निर्माण होगा

Web Summary : पुणे वन विभाग तेंदुए के बार-बार दिखने की घटनाओं को रोकने के लिए चार जंगल बनाएगा। इन जंगलों का उद्देश्य प्राकृतिक भोजन और आश्रय प्रदान करना है, जिससे मानव-तेंदुए संघर्ष कम होगा। इन जंगलों में बचाए गए तेंदुए रहेंगे, जिससे उन्हें सुरक्षित वातावरण मिलेगा।

Web Title : Four Forests to be Created in Pune for Leopard Habitat

Web Summary : To curb frequent leopard sightings, Pune Forest Department will create four forests. These habitats aim to provide natural food and shelter, reducing human-leopard conflict. The forests will house rescued leopards, offering a safer environment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.