जोडप्यामध्ये मतभेद अन् ३९ दिवसांत घटस्फोट; मागील दोन वर्षांपासून राहत होते विभक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 18:26 IST2026-03-20T18:26:00+5:302026-03-20T18:26:12+5:30
लग्नाच्या दोन वर्षानंतर ते एकमेकांपासून विभक्त राहू लागले, भविष्यात एकत्र येण्याची शक्यता नसल्याने दोघांनी परस्परसंमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला

जोडप्यामध्ये मतभेद अन् ३९ दिवसांत घटस्फोट; मागील दोन वर्षांपासून राहत होते विभक्त
पुणे : वैचारिक मतभेद आणि स्वभावातील विसंगतीमुळे पती-पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला. जोडपे हे मागील दोन वर्षांपासून विभक्त राहत असल्याने न्यायालयाने कुलिंग पिरीयडचा कालावधी वगळत ३९ दिवसांत हा निर्णय दिला. याप्रकरणात, दोघांच्या वतीने ॲड. मुकुल विनायक महिंद्रकर यांनी काम पाहिले.
राकेश आणि स्मिता (दोघांची नावे बदलली) अशी त्यांची नावे आहेत. तो 30 वर्षांचा तर ती 25 वर्षांची. दोघांचा विवाह 21 नोव्हेंबर 2021 रोजी झाला. लग्नाच्या दोन वर्षानंतर ते एकमेकांपासून विभक्त राहू लागले. भविष्यात एकत्र येण्याची शक्यता नसल्याने दोघांनी परस्परसंमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. यावेळी, वकिलांसह समुपदेशक तसेच त्यांच्या कुटुंबियांनी एकमेकांमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न केला. दोघेही घटस्फोटावर ठाम असल्याने कोणत्याही प्रकारचा पोटगी किंवा मालमत्तेचा वाद नसल्याचे नमूद करत दोघांनी ॲड. महिंद्रकर यांमार्फत न्यायालयासमोर संयुक्त अर्ज सादर केला होता. त्यानुसार ती घटस्फोटानंतर पतीचे नाव लावणार् नाही, एकमेकांवर कुणीही सोशल मीडियावर एकमेकांविषयीआरोप-प्रत्यारोप किंवा बदनामीकारक विधाने करणार नाहीत. दोन्ही कुटुंबाच्या सदस्यांपैकी कुणीही त्यांच्याविरुद्ध कोणतीही केस दाखल करणार नाहीत, अशा काही अटी शर्तींवर न्यायालयाने पती-पत्नीचा परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर केला.