Corona Virus News:...अधिकारी होण्याचं त्याचं स्वप्नं अधुरं राहिलं; 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्याचा कोरोनामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 18:44 IST2021-04-05T18:16:38+5:302021-04-05T18:44:55+5:30
सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यावर तो मागील ५ ते ६ वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु होती.

Corona Virus News:...अधिकारी होण्याचं त्याचं स्वप्नं अधुरं राहिलं; 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्याचा कोरोनामुळे मृत्यू
पुणे: राज्यासह पुण्यात कोरोनाचा उद्रेक प्रचंड वेगाने वाढतो आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह सर्वांचेच धाबे दणाणले आहे. या दिवसेंदिवस भयावह होत चाललेल्या कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला.त्यात आता उराशी अधिकारी होण्याच्या स्वप्न बाळगून दिवसरात्र मेहनत घेत असलेल्या एका एमपीएससी च्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मुळचा श्रींगोद्या तालुक्यातील वैभव शितोळे असे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्याचे नाव आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले. स्पर्धा परीक्षा हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत त्यात वैभवने स्वतःला पूर्णपणे झोकून तयारी सुरू ठेवली होती. मागील पाच ते सहा वर्षांहून अधिक काळ त्याची परीक्षांची तयारी करत होता. तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. आतापर्यंत विविध परीक्षेत यश मिळवले होते. तसेच मुलाखती पर्यंतचा टप्पा देखील गाठला होता. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर भविष्यात उत्तम यश पदरात पडू शकते हाच दृष्टिकोन बाळगून तो एमपीएससीच्या तयारी करत होता.पण त्याआधीच कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. त्याने उराशी बाळगलेलं अधिकारी होण्याचं स्वप्नं तसेच अर्धवट राहिलं.
ससून रुग्णालयात १६ मार्चपासून वैभववर उपचार सुरू होते.मात्र, २एप्रिलला त्याचा कोरोनामुळे निधन झाले.तो अभ्यासात अतिशय हुशार होता.
कोरोनामुळे हाताबाहेर जात असलेल्या परिस्थितीला आटोक्यात कसे आणावे हे आव्हान सर्वांसमोर आहे. तसेच आधीच सरकारकडून सातत्याने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे मेटाकुटीला आलेल्या या विद्यार्थ्यांना कोरोनापेक्षा परीक्षा महत्वाची वाटते आहे. कुठल्याही परिस्थितीत यावेळी परीक्षा द्यायचीच असा चंग त्यांनी मनाशी बांधलेला आहे.त्यामुळे सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनाची लक्षणे दिसत असतानाही ते त्याकडे दुर्लक्ष करत आहे.पण ते स्वतः सह इतरांच्या जीवाला धोक्यात निर्माण करणारे आहे.