Corona virus : आॅक्सिजनअभावी रुग्णांचा जीव टांगणीला ; पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमधील धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 08:00 AM2020-07-25T08:00:51+5:302020-07-25T08:05:02+5:30

मागणी वाढली तरी पुरेसे सिलेंडर उपलब्ध नाही...

Corona virus : Life in danger zone of patients due to no oxygen in naidu hospital at pune | Corona virus : आॅक्सिजनअभावी रुग्णांचा जीव टांगणीला ; पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमधील धक्कादायक वास्तव

Corona virus : आॅक्सिजनअभावी रुग्णांचा जीव टांगणीला ; पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमधील धक्कादायक वास्तव

Next
ठळक मुद्देसध्या रुग्णालयात दररोज 90 हुन अधिक जण ऑक्सिजनवर

राजानंद मोरे
पुणे : नायडू रुग्णालयामध्ये आॅक्सिजन अभावी रुग्णांचा जीव टांगणीला लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आॅक्सिजन सिलेंडर वेळेत न मिळाल्याने काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप येथील डॉक्टर व कर्मचाºयांकडूनच करण्यात आला आहे. मात्र, याकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात असल्याचे चित्र आहे. 
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिला रुग्ण नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर या रुग्णालयात कोरोनाबाधितांची रीघ लागली. पुण्यातील हे एकमेक सांसर्गिक रुग्णालय आहे. तरीही कोरोनापुर्वी तिथे आॅक्सिजनची गरज क्वचितच भासत होती. पण कोरोना हा प्रामुख्याने श्वसनाचा आजार असल्याने आॅक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. सध्या रुग्णालयात दररोज ९० हून अधिक रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. गंभीर असलेल्या १८ जणांना हाय फ्लो आॅक्सिजन लागतो. हे रुग्ण एका मजल्यावर असून तिथे पाईप लाईनद्वारे आॅक्सिजन पुरवठा होतो. पण अन्य रुग्णांसाठी ही व्यवस्था नसल्याने त्यांच्या बेडजवळच आॅक्सिजन सिलेंडर ठेवून गरजेनुसार आॅक्सिजन सुरू केला जातो. 
सध्या रुग्णालयाकडे जवळपास २०० जम्बो सिलेंडर आणि २०० मध्यम आकाराचे सिलेंडर आहेत. त्यामध्ये प्रत्येकी अनुक्रमे ४२ व १० लिटर आॅक्सिजन असतो. तर २४ तासात १६० ते १७० जम्बो सिलेंडरची गरज असते. ही गरज भागविण्यासाठी आॅक्सिजन पुरवठा करणाºया एजन्सीकडून दररोज सिलिंडर भरून दिले जातात. पण प्रत्यक्ष गरज आणि सिलेंडरची उपलब्धता जवळपास सारखी असल्याने अनेकवेळा तारेवरची कसरत करावी लागत आहे. काहीवेळा एजन्सीला सिलेंडर पोहचविण्यास विलंब झाल्यास आॅक्सिजनची कमतरता भासते. त्यामुळे काही रुग्णांना आॅक्सिजन मिळतही नाही. आॅक्सिजन कमी असल्याने त्याचा ‘फ्लो’ कमी करावा लागतो. पण असे क्वचित करावे लागते, अशी धक्कादायक माहिती विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. दरम्यान, याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटसुते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
------------------
नायडू रुग्णालयामध्ये आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी काही रुग्णांना वेळेत आॅक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे एका कर्मचाºयाने सांगितले. रुग्णालयातील एका डॉक्टरांनीही त्याला दुजोरा दिला. मागील आठवडाभरात असा प्रकार घडला आहे. तसेच यापुर्वीही काहीवेळा आॅक्सिजन कमी पडल्याच्या घटना घडल्याचे संबंधित डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आॅक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी सिलेंडरची संख्या वाढविणे गरजेचे आहे. रुग्णालयाच्या आवारात आॅक्सिजनची टाकी उभारून सर्व बेडला पाईपलाईद्वारे आॅक्सिजन पुरवठा करणे आवश्यक आहे. पण प्रशासनाकडून त्याकडे मागील चार महिने दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. 
-------------
अन्य रुग्णालयांचा भार
नायडू रुग्णालयातील उपलब्ध सिलेंडरचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत असताना दळवी रुग्णालय, सोनवणे रुग्णालय तसेच बोपोडी येथील रुग्णालयांनाही नायडूमधून सिलेंडर पुरवठा करावा लागत आहे. पण अपुºया सिलेंडरमुळे या रुग्णालयांना पुरेसे सिलेंडर देणे शक्य होत नसल्याचे सुत्रांनी सांगितले.
------------------

 

Web Title: Corona virus : Life in danger zone of patients due to no oxygen in naidu hospital at pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.