शरद पवार यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य, गोपीचंद पडळकर यांची निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 20:22 IST2025-06-03T20:21:44+5:302025-06-03T20:22:47+5:30
शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना, असे वादग्रस्त विधान भाजप नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी २०२० मध्ये केले होते. याप्रकरणी राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

शरद पवार यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य, गोपीचंद पडळकर यांची निर्दोष मुक्तता
बारामती : शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना, असे वादग्रस्त विधान भाजप नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी २०२० मध्ये केले होते. याप्रकरणी राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात खटला सुरू होता. या प्रकरणातून पडळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना खुद्द पडळकर यांनीच माहिती दिली. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर पडळकर यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. प्रा. लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसींचा निधी रोखल्याचा आरोप केला आहे. यावर पडळकर म्हणाले, उपमुख्यमंत्री पवार यांनी यावर तत्काळ बैठक घ्यावी. या बैठकीला सर्व ओबीसी नेत्यांना बोलवावे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित असावेत, त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
निधी अडवला असल्यास तो सोडता येईल, नसेल अडवला तर सांगता येईल. याबाबत स्पष्टता येईल, असे पडळकर म्हणाले. राष्ट्रवादीच्या प्रवक्ते यांनी प्रा. हाके यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याच्या प्रश्नावर पडळकर म्हणाले, टीका करण्याऐवजी त्याचे उत्तर देऊन शंकेचे निरसन करावे. राज्याला देवेंद्र फडवणीस यांच्यासारखा गृहमंत्री मिळाला आहे. महिलांवरील अत्याचाराबाबत शासन संवेदनशील आहे. गृहमंत्री या विषयावर लक्ष ठेवून आहेत, अशा शब्दांत पडळकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे काैतुक केले.
धनगर आरक्षण प्रश्नावर पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. धनगर समाजासाठी सरकारने अनेक योजना केल्या. मात्र, आरक्षण प्रश्नाचा निकाल लावण्याची मागणी होत आहे. ३१ मे च्या पार पडलेल्या कार्यक्रमात याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी मांडली आहे. नक्कीच आम्ही तो विषय मार्गी लावू. धनगर समाजाचे कार्यकर्ते बसून अजेंडा ठरवून आरक्षण प्रश्नावर पुढाकार घेणार असल्याचे पडळकर म्हणाले.