सह्याद्रीचे वादग्रस्त प्रकरण; दाम्पत्याच्या मृत्यूप्रकरणी 'क्लीन चिट'वर प्रश्नचिन्ह, वडिलांच्या निधनाने शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 13:28 IST2025-12-15T13:28:15+5:302025-12-15T13:28:36+5:30
स्वतंत्र वैद्यकीय तज्ज्ञ समिती स्थापन करून संपूर्ण उपचार प्रक्रियेचा तत्काळ तपास करावा आणि संबंधित डॉक्टर, कर्मचारी आणि प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी

सह्याद्रीचे वादग्रस्त प्रकरण; दाम्पत्याच्या मृत्यूप्रकरणी 'क्लीन चिट'वर प्रश्नचिन्ह, वडिलांच्या निधनाने शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचे गंभीर आरोप
पुणे : डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणासाठी दाखल केलेल्या पती-पत्नीचा अवघ्या काही दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणात रुग्णालय प्रशासनाला आरोग्य विभागाकडून नुकतीच क्लीन चिट मिळाली. मात्र, आता पुन्हा हडपसर येथील सह्याद्री रुग्णालयात केरू सकपाळ या रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी उपचारादरम्यान रुग्णालय प्रशासन व डॉक्टरांकडून गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप झाला आहे. त्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय तज्ज्ञ समिती स्थापन करून संपूर्ण उपचार प्रक्रियेचा तत्काळ तपास करावा आणि संबंधित डॉक्टर, कर्मचारी आणि प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिंदेसेनेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि अक्षय ढमाले यांनी केली आहे.
हडपसर येथील सह्याद्री रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान शिंदेसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे शहरप्रमुख अजय सकपाळ यांचे वडील केरू सकपाळ यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यावर अजय सकपाळ यांनी आपल्या वडिलांवर उपचारात डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाच्या समोरील बाजूकडील काचेची तोडफोड केली. या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल झाली आहे.
सह्याद्री रुग्णालयातील निष्काळजीपणा केरू सकपाळ यांच्या जीवावर बेतला आहे. या प्रकरणी सखोल तपास करण्यात यावा, रुग्णाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय तज्ज्ञ समिती नियुक्त करावी. उपचारादरम्यान हलगर्जीपणा आढळल्यास रुग्णालय प्रशासनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. उपचारात निष्काळजीपणा केलेल्या डॉक्टरांवर, कर्मचाऱ्यांवर, प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात उपचारादरम्यान योग्य वैद्यकीय प्रोटोकॉल पाळले गेले की नाही? रुग्णालय प्रशासनाने वेळेवर योग्य उपचार केले की नाही? रुग्णालयाकडून निष्काळजीपणा, दुर्लक्ष किंवा चुकीची प्रक्रिया झाली का? या सर्व प्रश्नांची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
वैद्यकीय निष्काळजीपणामुळे आई-वडील गमावले
डेक्कन सह्याद्री हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणादरम्यान बापू कोमकर व त्यांच्या पत्नीचा अवघ्या काही दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याप्रकरणी त्यांचा मुलगा वेदांत बापू कोमकर यांनी वैद्यकीय निष्काळजीपणामुळे आई-वडिलांना गमावल्याचा आरोप केला आहे. याबरोबरच आम्ही दोन अल्पवयीन भावंडे उदरनिर्वाहाशिवाय आहोत, तरी न्याय मिळावा, अशी विनंती केली आहे. वेदांत कोमकर (वय २१ वर्षे) आणि त्यांची लहान बहीण रितीका (वय १३ वर्षे) या दोघांवर आई-वडील गमावल्याची वेळ ओढवली आहे. कुटुंबाला कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही.
१५ ऑगस्ट २०२५ रोजी वेदांतचे वडील बापू बाळकृष्ण कोमकर यांना लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी सह्याद्री हॉस्पिटल, डेक्कन येथे दाखल केले होते. त्याच दिवशी त्यांचे निधन झाले. डॉक्टरांनी थोडी रिस्क आहे, असे सांगितले होते. परंतु, शस्त्रक्रियेदरम्यान नेमके काय झाले? याची माहिती कुटुंबाला दिली गेली नाही, असा आरोप वेदांत यांनी केला आहे. याच धक्क्यात, २२ ऑगस्ट २०२५ रोजी वेदांत यांची आई कामिनी बापू कोमकर यांचेही निधन झाले. आईला कोणताही धोका नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते. तरीही आईच्या मृत्यूचे कारण आजतागायत सांगितले गेले नसल्याचा आरोप वेदांत यांनी केला आहे. उदरनिर्वाहाचे साधन नसलेल्या दोन भावंडांनी शासन, पोलिस प्रशासन व आरोग्य यंत्रणेकडे न्याय मिळावा तसेच सह्याद्री हॉस्पिटलने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या ‘क्लीन चिट’वर प्रश्नचिन्ह
यकृत प्रत्यारोपणादरम्यान आई-वडिलांच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य विभागाने नेमलेल्या चौकशी समितीने रुग्णालयाला क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे आमच्या प्रकरणात पक्षपाती निर्णय झाल्याची दाट शंका आहे. आई-वडिलांच्या मृत्यूचे खरे कारण आजही आम्हाला सांगितले गेलेले नाही. आम्ही डेक्कन पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र चौकशीत विलंब, निष्काळजीपणा आणि रुग्णालयाला संरक्षण दिले जात असल्याचा आम्हाला अनुभव आला आहे. - वेदांत कोमकर