कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 09:49 IST2025-11-11T09:48:47+5:302025-11-11T09:49:00+5:30
सकाळी दिंडी जुना पुणे मुंबई महामार्ग क्रॉस करताना पुण्याच्या दिशेने येणारा कंटेनर अतिशय वेगाने येऊन वारकऱ्यांच्या दिंडीत शिरला

कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
पवनानगर: कार्तिकी एकादशी निमित्त आळंदी येथे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीला आज सकाळी भीषण अपघात झाला. कामशेत परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने वारकऱ्यांना चिरडले. या भीषण अपघातात एका महिला वारकरीचा जागीच मृत्यू झाला असून दहा वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उरण-पनवेल येथील जसळी दिंडी गेल्या चार दिवसांपूर्वी आळंदी कडे निघाली होती. आज सकाळी कामशेत येथे जुन्या पुणे मुंबई हायवेवर वारकरी मंडळींनी चहा-नाश्ता करून रस्ता ओलांडत असताना भरधाव कंटेनरने १० ते १२ वारकऱ्यांना जोराची धडक दिली. या अपघातात प्रियंका तांडेल (वय ५५, रा. करळ, ता. उरण, जि. रायगड) या महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले आहे. जखमी अवस्थेत असलेले वारकरी कामशेत येथील खाजगी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जखमी वारकऱ्यांची नावे:
१)दत्तात्रय विष्णु घरत (वय ६५, रा. चिरनेर, ता. उरण)
२) हिराबाई पोसा पाटील (वय ६५, रा. चिरले, ता. उरण)
३)कामिनी दत्तात्रय गांधी (वय २८, रा. चिरले, ता. उरण)
४)अपर्णा अनंत ठाकूर (वय ५०, रा. जासाई, ता. उरण)
५)नंदू अप्पा चोपडे (वय ५५, रा. नायगाव, ता. मावळ)
६)ज्ञानदेव निवृत्ती गाडे (वय ५५, रा. नाणोली, ता. मावळ)
७)तान्हाजी पुनाजी हेमाडे (वय ४०, रा. वडेश्वर, ता. मावळ)
८)प्रभाकर लक्ष्मण तांडेल (वय ६२, रा. करळपाडा, ता. उरण)
९) शारदा ठाकूर (वय ४५, रा. जासाई, ता. उरण)
१०)जंदाळा अशोक कुमार (वय ३०, रा. जासाई, ता. उरण)
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वारकरी बांधवांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अपघातानंतर कंटेनर चालकाने पळ काढल्याचे समजते. कामशेत पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.