मूल होत नसल्याने नेहमी वाद; चारित्र्यावरही संशय, बायकोचा गळा दाबून खून करून नवरा पोलीस ठाण्यात हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 20:39 IST2025-12-27T20:38:56+5:302025-12-27T20:39:52+5:30
दोघांचे २०१८ मध्ये लग्न झाले असून पत्नीला मूल होत नसल्याने त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. तसेच गेल्या काही दिवसांपासून तो प्रियांकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता

मूल होत नसल्याने नेहमी वाद; चारित्र्यावरही संशय, बायकोचा गळा दाबून खून करून नवरा पोलीस ठाण्यात हजर
पुणे: चारित्र्याच्या संशयासह मूल होत नसल्याच्या कारणाने नवऱ्याने बायकोचा गळा दाबून खून केल्याची घटना हडपसरमधील भेकराईनगर परिसरात घडली. खून केल्यानंतर नवरा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. फुरसुंगी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी नवऱ्याला अटक केली.
प्रियांका आकाश दोडके (२७, रा. गुरुदत्त काॅलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, आकाश विष्णू दोडके (३५) असे आरोपी नवऱ्याचे नाव आहे. याबाबत प्रियांका यांचा भाऊ सागर रामदास अडागळे (३५, रा. नानगाव, ता. दौंड) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश आणि प्रियांका यांचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. आकाश हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. आकाशचे आई-वडील, भाऊ सिंहगड रोड परिसरा राहायला आहेत. विवाहानंतर प्रियांकाला मूल होत नसल्याने त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. तसेच गेल्या काही दिवसांपासून तो प्रियांकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्याने प्रियांकाशी वाद घालून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. शुक्रवारी (दि. २६) रात्री प्रियांका आणि आकाश यांच्यात पुन्हा वाद झाला. त्याने प्रियांकाला मारहाण करुन गळा दाबून खून केला. ती बेशुद्ध पडल्यानंतर तो पोलिस चौकीत गेला आणि पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच ती मरण पावल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी आकाश याला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब जाधव करत आहेत.