सतत वाद! नेहमी मारहाण; त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल, पत्नीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:09 IST2025-06-05T18:09:28+5:302025-06-05T18:09:57+5:30
पतीने आत्महत्येस पत्नी जबाबदार असल्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करून ठेवल्याने अखेर आत्महत्येचा उलगडा झाला

सतत वाद! नेहमी मारहाण; त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल, पत्नीवर गुन्हा दाखल
उरुळी कांचन: पत्नीने पती बरोबर सतत वाद करणे व पतीस मारहाण करणे या गोष्टीला कंटाळून एका ३२ वर्षीय व्यक्तीने मौजे कोरेगाव मूळ ता. हवेली इनामदार वस्ती जेधे चाळ परिसरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १८ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुरज दामोदर पवार (वय ३२) रा. इनामदार वस्ती जेधे चाळ चिंतामणी हॉस्पिटल च्या मागे असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
आत्महत्या केलेल्या व्यक्तीने आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये चित्रीकरण करत आत्महत्येस पत्नी जबाबदार असल्याचे कारण सांगितले असल्याचा पुरावा कुटूंबीयांच्या हाती लागला अन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मयुरी सुरज पवार उर्फ मयुरी अनिल जाधव, (वय २६, रा. जेथे चाळ इनामदारवस्ती, कोरेगावमूळ, रा. सध्या सोरतापवाडी ता. हवेली) हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. याबाबत दामोदर निवृत्ती पवार (वय ६०, रा. वाल्हे, वागदरवाडी ता. पुरंदर) यांनी बुधवारी (दिनांक ०४ ) दुपारी उरुळी कांचनपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एक वर्षापासून पवार दोघे पती-पत्नी हे कोरेगावमूळ येथील इनामदार वस्ती परिसरात राहत होते. त्यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मयुरी ही पती सुरज याला नेहमी मारहाण करत वाद घालत होती. या मानसिक त्रासाला कंटाळून पती सुरज यांनी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने १८ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. आत्महत्येस पत्नी जबाबदार असल्याचे चित्रीकरण मोबाईल फोन मध्ये करून ठेवल्याने अखेर आत्महत्येचा उलगडा झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मीरा मटाले करीत आहेत.