पत्रकारांच्या मदतीने बदनामीचा कट; २५ लाखांच्या ‘डील’चा आरोप - ॲड. रूपाली ठोंबरे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 14:01 IST2026-04-11T14:00:05+5:302026-04-11T14:01:27+5:30
पक्षात कोणतीही किंमत नसलेल्या एका महिलेने आपल्याला महत्त्वाची पदे मिळू नयेत, यासाठी हे षडयंत्र रचल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

पत्रकारांच्या मदतीने बदनामीचा कट; २५ लाखांच्या ‘डील’चा आरोप - ॲड. रूपाली ठोंबरे-पाटील
पुणे: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अडकवून माझी प्रतिमा डागाळण्यासाठी पत्रकारांना हाताशी धरून कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नेत्या ॲड. रूपाली ठोंबरे-पाटील यांनी केला आहे. यासाठी तब्बल २५ लाखांची ‘डील’ करण्यात आल्याचा दावा त्यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
पक्षात कोणतीही किंमत नसलेल्या एका महिलेने आपल्याला महत्त्वाची पदे मिळू नयेत, यासाठी हे षडयंत्र रचल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘एका वृत्तवाहिनीचा पत्रकार रोहन कदम आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य तिघा पत्रकारांनी मिळून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला,’ असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, बुधवार पेठेतील एका लॉजमध्ये घडलेला धक्कादायक प्रकारही त्यांनी उघड केला. संबंधित पत्रकारांनी लॉजमध्ये जाऊन एका महिलेचा अश्लील व्हिडिओ चित्रित केला. ‘शूटिंग करताना त्या महिलेला संशय आल्याने तिने चपलेने पत्रकाराला मारहाण केली आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार उघडकीस आल्याने बदनामीचा कट फसला,’ असेही ठोंबरे-पाटील यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, ‘रोहन कदम हा पोलिस ठाण्यात जाऊन ‘स्टिंग ऑपरेशन’साठी गेलो होतो, असे सांगत होता. मात्र, प्रत्यक्षात हा सगळा कट माझ्या विरोधात होता. या प्रकरणात आणखी तीन पत्रकारांचा सहभाग असून, त्यांची नावे मी माझ्या तक्रार अर्जात पोलिसांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.’
लॉजबाबतच्या आरोपांवरही त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “तो लॉज आमच्या नातेवाईकाचा असला, तरी वीस वर्षांपूर्वीच तो भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. त्याचा माझ्याशी कोणताही संबंध नाही.” याप्रकरणी संबंधित पत्रकारांवर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी काही जणांकडून पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचाही आरोप ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला. “आम्ही पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली असून, तत्काळ गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात दाद मागू,” असेही त्यांनी सांगितले.