भाजपच्या नियुक्तीपत्र मेळाव्याला काँग्रेसचे रोजगार मेळाव्याचे प्रत्युत्तर, ४० कंपन्यांना निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 19:26 IST2025-09-12T19:25:51+5:302025-09-12T19:26:03+5:30
सरकारच्या साह्याने राबवण्यात येत असलेल्या भाजपच्या या मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे

भाजपच्या नियुक्तीपत्र मेळाव्याला काँग्रेसचे रोजगार मेळाव्याचे प्रत्युत्तर, ४० कंपन्यांना निमंत्रण
पुणे: केंद्र व राज्य सरकारच्या वतीने नोकरभरतीची नियुक्तीपत्र वाटण्यासाठी मेळावे घेतले जातात. काँग्रेसने त्याला प्रत्युत्तर म्हणून आता रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले आहे. असा पहिला मेळावा १६ सप्टेंबरला पक्षाच्या मुंबईतील टिळक भवन या प्रदेश मुख्यालयात ४० कंपन्यांना यासाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यानंतर पुढे प्रत्येक जिल्ह्यात पक्षाच्या वतीने असे मेळावे घेतले जाणार आहेत.
केंद्र व राज्य सरकार तसेच खासगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळाल्याची नियुक्ती पत्रे वाटपाचे मेळावा सरकारच्या वतीने मंत्री तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने देशात तसेच राज्यातही घेतले जात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने या मेळाव्यांचे आयोजन केले जाते. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सरकारच्या साह्याने राबवण्यात येत असलेल्या भाजपच्या या मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदेश कार्यालयात होणाऱ्या पहिल्याच मेळाव्यात ४० कंपन्या सहभागी होतील. तिथेच पात्र उमेदवार निवडून त्यांना नोकरी दिली जाईल. आयटी, बँकिंग, रिटेल, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रांतील ४० पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहेत. इयत्ता ८ वी उत्तीर्णपासून ते उच्च शिक्षित गरिब विद्यार्थ्यांना यातून नोकरीची संधी मिळणार आहे. पक्षाच्या वतीने या मेळाव्यानंतर पुढे प्रत्येक जिल्ह्यातील पक्ष कार्यालयात असे मेळावे घेण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश कार्यालयातून देण्यात आली.