चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात काँग्रेस आघाडीला मिळेना उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 07:00 IST2019-10-06T07:00:00+5:302019-10-06T07:00:07+5:30

मनसेच्या उमेदवाराला दिलेला हा पाठिंबा हा स्थानिक नेतृत्वाचा निर्णय

Congress and Ncp does not get a candidate against Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात काँग्रेस आघाडीला मिळेना उमेदवार

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात काँग्रेस आघाडीला मिळेना उमेदवार

ठळक मुद्देकोथरुडमध्ये मनसेला दिला पाठिंबा

पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवारही मिळत नसल्याची नामुष्की काँग्रेस आघाडी आणि तिच्या घटकपक्षांवर आली. त्यामुळे काँग्रेस आघाडीत प्रवेश न दिलेल्या मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची पाळी आघाडीवर आली आहे.
 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आव्हान देत पाटील यांच्या विरोधात लढण्याचे सूतोवाच केले होते. मात्र पाटील यांनी कोल्हापुर जिल्ह्यातील मतदारसंघ न निवडता पुण्यातील मतदारसंघ निवडल्यानंतर शेट्टी यांच्या आव्हानातील हवा निघून गेली. त्यानंतर त्यांनी चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना ‘स्वाभिमानी’तर्फे उतरवण्याची तयारी केली. मात्र तरडे आणि पाटील यांच्या भेटीची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर तोही मुद्दा निकाली निघाला. काँग्रेस-राष्ट्रवादी या दोघांकडेही कोथरुडमधून एकाही इच्छूकाने उमेदवारी मागितली नाही.
कोथरुडमधील शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना पाटील यांच्या विरोधात उतरवण्यासाठी काँग्रेस आघाडीतर्फे प्रयत्न झाले. मात्र त्यालाही यश आले नाही. शेवटी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय कॉंग्रेस आघाडीने घेतला. राज्यपातळीवर मनसेला काँग्रेस आघाडीत स्थान नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापुर्वीच जाहीर केले. मात्र, कोथरुडमध्ये उमेदवारच न मिळाल्याने मनसेला पाठिंबा देण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्त्वाने घेतल्याचा खुलासा नंतर करण्यात आला.
 मनसे उमेदवार शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत शुक्रवारी झाला. भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातील मतांमध्ये विभाजन होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. बैठकीला काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष चेतन तुपे, ‘राष्ट्रवादी’च्या खासदार वंदना चव्हाण तसेच दोन्ही पक्षांचे आजीमाजी आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आदी उपस्थित होते. आघाडीच्या जागावाटपात कोथरूड मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’कडे होता. ‘‘चंद्रकात पाटील यांना एकास एक लढत देण्यासाठी आघाडीने हा निर्णय घेतला,’’ असे सांगत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि काँग्रेसचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांनी पाठिंब्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. दरम्यान मनसेच्या उमेदवाराला दिलेला हा पाठिंबा हा स्थानिक नेतृत्वाचा निर्णय असून, तो पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघापुरताच मर्यादित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़

Web Title: Congress and Ncp does not get a candidate against Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.