जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 14:45 IST2025-11-22T14:44:41+5:302025-11-22T14:45:38+5:30
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत अजित पवार गटाने केलेल्या फोडाफोडी आणि तडजोडींमुळे शरद पवार गटाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसते

जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
पुणे : पुणे जिल्ह्यात स्वबळावर मजबूत पकड निर्माण करणारे आणि स्वतःची स्वतंत्र ताकद सिद्ध करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीत मात्र अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी फोडाफोड, तडजोडी, आयात उमेदवार आणि गुप्त आघाड्या यांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांच्या एकेकाळच्या निर्विवाद बालेकिल्ल्यात ‘ताकदीच्या मर्यादा’ स्पष्ट झाल्या असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
भोर, राजगुरुनगर, इंदापूर आणि जेजुरी नगर परिषदांमध्ये अजित पवार गटाने बाहेरील पक्षांतील उमेदवारांना आयात करून निवडणूक उभी केली आहे. काही ठिकाणी भाजप आणि शिंदेसेनेशी तडजोडी करून समन्वय साधावा लागला. भाजपने जिल्ह्यात बळ वाढवल्यानंतर अजित पवार यांना प्रथमच अनेक ठिकाणी स्वतःच्याच कार्यकर्त्यांऐवजी परस्परविरोधी पक्षांशी हातमिळवणी करावी लागत आहे.
माळेगावला विरोधकांशी हातमिळवणी
बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीत दीर्घकाळाचे कट्टर विरोधक रंजन तावरे यांच्याशी आघाडी करूनच अजित पवार गटाला निवडणूक रिंगणात उतरावे लागले. जेजुरी नगर परिषदेमध्ये दिलीप बारभाई यांचे दीर्घकालीन वर्चस्व असताना त्यांच्या मुलासह माजी नगरसेवकांना गटात सामील करून घेतले. भोर नगर परिषदेतील पूर्वा समिती गटाचे रामचंद्र आव्हाड यांना फोडून पवार गटात आणले. याशिवाय शिंदेसेनेच्या काही उमेदवारांची पळवापळवी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
खेड-तळेगावात तडजोडीचे राजकारण
खेड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी पवार गटाकडे कामचलाऊ पर्याय नसल्याने सर्वपक्षीय उमेदवारांना गळाला लावून स्वतःकडे आणले गेले. तळेगाव नगर परिषदेत भाजपचा परंपरागत प्रभाव लक्षात घेता, अजित पवार गटाने अडीच वर्षांचे नगराध्यक्षपद देऊन तडजोड केली आहे. फुरसुंगी नगरपंचायतीतदेखील गटाला तडजोडीला मान्यता द्यावी लागली.
‘भाजप मॉडेल’चा अवलंब आणि कार्यकर्त्यांत नाराजी
अजित पवार गटाकडून ग्रामीण भागात “भाजप फार्म्युला” अवलंबल्याचे चित्र समोर आले आहे. थेट विरोधकांशी तडजोड, उमेदवार आयात, स्थानिकांऐवजी बाहेरच्या नेतृत्वावर भर, या रणनीतीमुळे गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, अजित पवार स्वतः चर्चा करून समाधान करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शरद पवार गटाचे सर्वाधिक नुकसान
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत अजित पवार गटाने केलेल्या फोडाफोडी आणि तडजोडींमुळे शरद पवार गटाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसते. जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांमधून अजित पवार यांचे बालेकिल्ले जरी टिकवण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी एकूणच त्यांच्या राजकीय प्रभावाच्या मर्यादा समोर आल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
जिल्ह्यातील ३८ जागा झाल्या बिनवरोध
जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा धुरळा उडत असून फोडाफोडी, आयातउमदेवार यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कुठे मित्रपक्षांशी युती तर कुठे दोस्तीत कुस्ती खेळण्याचा डाव आखला गेला आहे. मात्र, जिल्ह्यातील तब्बल ३८ जागा बिनविरोध झाल्याचे समोर आले आहे. बारामतीमध्ये ८, मंचर १, राजगुरुनगर ३, चाकण ३, सासवड २, तळेगाव दाभाडे १९ आणि लोणावळा २ असे एकूण ३८ जागा बिनविरोधत झाल्या आहेत. दरम्यान, बंडखोरांची नाराजी दूर करण्यात वरिष्ठ नेत्यांनाही जमले नसल्यामुळे निवडणुकीत स्थानिक पातळीवर चुरस पहायला मिळणार आहे.