देशभरात व्यावसायिक गॅस थांबवला; घरगुती गॅसला प्राधान्य, काळजी करू नका - मुरलीधर मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:25 IST2026-03-11T15:24:06+5:302026-03-11T15:25:28+5:30
घरगुती गॅस कमी पडणार नसून केंद्राने तशी काळजी घेतली असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे

देशभरात व्यावसायिक गॅस थांबवला; घरगुती गॅसला प्राधान्य, काळजी करू नका - मुरलीधर मोहोळ
पुणे : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका भारतियांना बसत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडर गॅस (दि. ५ मार्च) गुरुवारपासून कंपन्यांनी वितरणास व बुकिंगसाठी बंदी घातली आहे. जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय हॉटेल व्यवसायातील कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असून पुणे-मुंबईतील हॉटेल व्यवसायांना लवकरच टाळे लावण्याची वेळ येईल, अशी भीती हॉटेल -रेस्टॉरंट ॲण्ड हॉटेलिंग असोशिएशन यांनी केली आहे. कोरोनामध्येही एवढी वाईट अवस्था नव्हती झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले आहे.
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर मिळण्यासाठी देखील रांगा दिसून आल्या आहेत. पुर्वी घरगुती सिलिंडर गॅस बुकिंगसाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. तो आता ३० दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. एका ग्राहकाला एकच सिलिंडर मिळणार आहे. यामुळे घरगुती सिलिंडर गॅस बुकिंगसाठी नागरिकांची धावाधाव सुरू असून बुकिंग करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गॅस वितरक कंपन्यांकडून ग्राहकांची गैरसोय होत आहे. तर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असलं तरी देखील प्रत्यक्षात गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना वितरण कार्यालयांमध्ये जावे लागत आहे.
या गॅस सिलेंडर वितरणाबाबत आता खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. मोहोळ म्हणाले, देशभरात व्यावसायिक क्षेत्राचा गॅस थांबवला आहे. व घरगुती गॅसला प्राधान्य देण्यात आलं आहे. काळजी करण्याचे कारण नाही. घरगुती गॅस कमी पडणार नाही. केंद्राने तशी काळजी घेतली आहे, त्याला काही कालावधी जावा लागणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले आहे.
दरम्यान घरगुती गॅसच्या किमती ६० रुपयांनी वाढल्या असतानाच आता घरगुती सिलिंडरसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकदा गॅसची बुकिंग करताना तांत्रिक अडचणी येत आहे, तर बुकिंग केल्यानंतर सिलिंडर मिळण्यास ४ ते ७ दिवसांचा विलंब होत आहे. तसेच घरगुती गॅस बुकिंगसाठी रांगा लागत आहेत. यामुळे ग्राहकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.