पुणे जिल्ह्यातील गाव नकाशावरील रस्त्यांची रंगनिहाय नोंद, शिरूर तालुक्यामधून सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:59 IST2025-11-28T15:58:13+5:302025-11-28T15:59:09+5:30
- सर्व तालुक्यांमधील १५ गावांमध्ये अंमलबजावणी

पुणे जिल्ह्यातील गाव नकाशावरील रस्त्यांची रंगनिहाय नोंद, शिरूर तालुक्यामधून सुरुवात
पुणे : गावातील रस्ते कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गाव नकाशावरील सर्व रस्त्यांची रंगनिहाय नोंद करून, महसूल अभिलेखात त्यांची अधिकृत नोंद करण्याचे ठरविले आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील १५ गावांमध्ये करण्यात येणार आहे. यामुळे शेत रस्त्यांवरील वाद आणि अतिक्रमणांवर नियंत्रण येईल, असा प्रशासनाला विश्वास आहे. याची सुरुवात शिरूर तालुक्यातून करण्यात आली आहे.
जमाबंदी आणि गट नकाशांमध्ये काही रस्त्यांचे दाखले नोंदविले गेले असले, तरी नव्याने तयार झालेल्या रस्त्यांच्या नोंदी अभिलेखात नसल्यामुळे स्थानिक पातळीवर वाद, अतिक्रमण आणि तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सर्व ग्राम रस्ते, शिव रस्ते, गाडीमार्ग आणि पाऊलवाटा आता जीआयएस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गाव नकाशावर दाखविण्यात येणार आहेत. शेतातील कामांसाठी आणि शेतमाल बाजारात पोचविण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांची महसूल अभिलेखात अधिकृत नोंद करण्यात येणार आहे. संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील ‘इतर हक्क’ रकान्यात रस्त्यांचा उल्लेख नोंदविला जाईल. याची सुरुवात शिरूर तालुक्यातील गावांमधून केली आहे.
आराखडा समितीची स्थापना
या रस्त्यांना त्यांच्या प्रकारानुसार रंग दिला जाणार आहे. त्यासाठी गावात ग्राम रस्ता आराखडा समिती स्थापन होईल. यात एकूण नऊ सदस्य राहणार असून, मंडल अधिकारी अध्यक्ष राहतील. ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहायक, पोलिसपाटील, कोतवाल, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य, ग्राम महसूल अधिकारी यांचा समावेश असणार आहे. समिती गावातील विविध रस्त्यांचे अभिलेख अद्ययावत करून यादी तयार करेल. ज्या रस्त्यावर अतिक्रमण आहे, त्याची गाव नकाशावर नोंद घेऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.
हे रंग देणार...
एका गावाच्या हद्दीतून दुसऱ्या गावाच्या हद्दीपर्यंत जाणाऱ्या ग्रामीण रस्त्यांना नारंगी रंग दिला जाणार आहे. हद्दीच्या ग्रामीण रस्त्याला निळा रंग, गाडीमार्ग म्हणजेच पोटखराबा रस्त्याला हिरवा रंग दिला जाणार आहे. पायवाटेला गुलाबी रंग, तर शेतावर जाण्याच्या गाडीमार्गाला तपकिरी रंग दिला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अतिक्रमण केलेल्या रस्त्यांना लाल रंग दिला जाणार आहे.